...म्हणून विद्यार्थिनींचे कपडे उतरवल्याचे आरोप, शाळा प्रशासनाचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 12:37 PM2018-03-05T12:37:23+5:302018-03-05T12:37:23+5:30
बारावीच्या परीक्षेत कॉपी असल्याच्या संशयामुळे मुलींची कपडे काढून तपासणी केल्याचा घृणास्पद प्रकार लोणी काळभोर येथील एमआयटी युनिव्हर्सिटीच्या विश्वराज गुरुकुल या नामांकित शाळेत घडला होता.
पुणे : बारावीच्या परीक्षेत कॉपी असल्याच्या संशयामुळे मुलींची कपडे काढून तपासणी केल्याचा घृणास्पद प्रकार लोणी काळभोर येथील एमआयटी युनिव्हर्सिटीच्या विश्वराज गुरुकुल या नामांकित शाळेत घडला होता. या प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे. कॉपी करू दिली जात नसल्याने खोटे आरोप करण्यात आल्याचं शाळा प्रशासनाने म्हटलं आहे.
एमआयटी महाविद्यालयाच्या या परीक्षा केंद्रावर सुमारे 260 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या परीक्षा केंद्रावर नियमांचे काटेकोर पालन करून बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. एका विद्यार्थिनीने तिला कॉपी न करू दिल्यामुळे, त्याचा राग मनात धरून, तिने व तिच्या पालकांनी खोट्या व विपर्यस्त तक्रारी देऊन, संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये या करिता सर्वच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांकरिता पुरुष कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या तपासणीकरिता महिला कर्मचारी, महिला होमगार्ड उपस्थित असतात. त्यामुळे मुलींची चुकीची पद्धतीने तपासणी करण्यात आल्याचे आरोप खोटे आहेत. राज्य मंडळाच्या भरारी पथकाने येथील अनेक विद्यार्थ्यांच्या कॉपी जप्त केल्या आहेत. त्यामुळे कॉपी करू दिली जात नसल्याने खोटे आरोप करण्यात आल्याचा खुलासा शाळा प्रशासनाकडून केला आहे.
कॉपी तपासण्यासाठी शाळेतील महिला सुरक्षा रक्षक सुपरवायझर आणि एका महिला कर्मचाऱ्याने मुलींना दुसऱ्या खोलीत नेऊन त्यांची तपासणी केली. यासाठी कपडे काढायला लावले, असा आरोप मुलींनी केला आहे.
एमआयटीच्या लोणी काळभोर येथील परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा देणा-या काही विद्यार्थ्यांना कॉपी न करू दिल्यामुळे त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिल्याची तक्रार शाळा प्रशासनाकडून पोलिसांकडे केली आहे. त्याचबरोबर राज्य मंडळाकडेही याबाबत लेखी तक्रार केली आहे. तसंच पालकांनीही त्यांच्या पाल्यांना कॉपी करू न दिल्यामुळे, संस्थेच्या प्राचार्य व इतर कर्मचा-यांना शिवीगाळ केल्याचे शाळेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.