पुणे : शासनाने हॉटेल व बार यांना रात्री दहावाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, असे असताना किराणामाल, फळे, कपडे, जनरल स्टोअर यांना सायंकाळी सातपर्यंत मर्यादा घातली आहे. सणासुदीच्या काळात ही मर्यादा अन्यायकारक असून, सर्वच व्यवसायांना रात्री ९ पर्यंत पालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी राजकीय पक्षांसह ,व्यापारी वर्गातून पुढे आली आहे.
शहरातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ टेड असोसिएशन ऑफ पुणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. आगामी काळातील नवरात्र व दिपावली या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकाने १७ ऑक्टोबर पासून रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पुणे शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी केली आहे़.
रात्री १० पर्यंत परवानगीबाबत महापौरांचे आयुक्तांना पत्रसणासुदीचे दिवस असल्याने सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी द्यावी असे पत्र महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना गुरुवारी रात्री दिले आहे. राज्य शासनाने ५ ऑक्टोबरपासून शहरातील हॉटेल व बार रात्री १० पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिलीं आहे.
आढावा बैठकीकडे लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज ( शुक्रवारी ) होणाऱ्या आढावा बैठकीत सर्व दुकाने , व्यवसायांना रात्री ९ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी मिळणार का याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष असणार आहे. सणासुदीच्या काळात गर्दी टाळण्यासाठी दुकानांना अधिकची वेळ देणे योग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
.