दळणवळणासाठीचा पर्यायी रस्ता धोकादायक
By admin | Published: January 12, 2017 01:52 AM2017-01-12T01:52:14+5:302017-01-12T01:52:14+5:30
वासुली (ता. खेड) गावाकडे सुदुंबरे (ता. मावळ) गावाकडून येणारा रस्ता एनडीआरएफने बंद केल्याने नागरिकांचे
आंबेठाण : वासुली (ता. खेड) गावाकडे सुदुंबरे (ता. मावळ) गावाकडून येणारा रस्ता एनडीआरएफने बंद केल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दळणवळणासाठी बनविलेला पर्यायी रस्ता धोकादायक आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना जणू मृत्यूच्या सापळ्यातूनच प्रवास करावा लागत आहे.
मावळ तालुक्याचे टोक असणाऱ्या सुदुंबरे गावाकडून खेड तालुक्यात प्रवेश करण्यासाठी सुदुंबरे ते वासुली असा रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या जागेवर एनडीआरफने आपले बस्तान बसविले. त्यामुळे हा रस्ता साहजिकच त्यांच्या ताब्यात गेला. कालपरवापर्यंत या रस्त्याने वाहतूक आणि नागरिकांची ये-जा सुरू होती. परंतु त्यानंतर त्यांनी हा रस्ता बंद केला आणि दुसऱ्या बाजूने पर्यायी रस्ता काढून दिला.
परंतु हा काढून दिलेला पर्यायी रस्ता धोकादायक असून एका बाजूने संरक्षक भिंत आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र खोल दरीसारखा तीव्र उताराचा भाग असल्याने प्रवास करताना नागरिकांचे डोळे फिरतात.
ज्या बाजूला खोल दरीसारखा भाग आहे, त्या बाजूला खोलगट भागात मोठ्या प्रमाणात खोदाई केली आहे. त्यामुळे हा रस्त्याच्या कडेचा भाग अतिशय तीव्र उताराचा बनला आहे.
याशिवाय या मार्गावर असणारी आरसीसी मोरीदेखील खोदाई केल्याने सध्या तरंगत्या स्वरूपात आहे.
मोरीच्या खालच्या बाजूला खोदाई केल्याने मोरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय या ठिकाणी तीव्र वळण आणि उताराचा भाग असल्याने प्रवासी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
(वार्ताहर)
जीव धोक्यात घालून प्रवास
हा पर्यायी रस्ता कच्च्या स्वरूपाचा असल्याने त्यावर दगड-गोट्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सुदुंबरे येथे शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, याशिवाय पिंपरी-चिंचवड या भागात कामासाठी जाणारे चाकरमानी, दूधव्यवसाय करणारे नागरिक यांचा या मार्गाचा मोठा वापर असल्याने सध्या त्यांची गैरसोय होत आहे. जरी या बाजूने रस्ता काढून दिला असला तरी प्रवासी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तो सुरक्षित असणे अतिशय गरजेचा आहे, अशी या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची अपेक्षा आहे.