आंबेठाणला भंगार माफिया जोरात, चोरट्या मालाची खरेदी-विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:00 AM2018-01-30T03:00:54+5:302018-01-30T03:01:01+5:30
वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच आंबेठाण परिसरात अवैध धंदेही वाढीस लागले आहेत. येथील कंपन्यांतून मालाची चोरी करून तो भंगारात विकण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या भंगार व्यावसायिकांचे फावले असून, भंगार गोळा करण्याच्या नावाखाली चोºयांचे सत्र वाढले आहेत.
आंबेठाण : वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच आंबेठाण परिसरात अवैध धंदेही वाढीस लागले आहेत. येथील कंपन्यांतून मालाची चोरी करून तो भंगारात विकण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या भंगार व्यावसायिकांचे फावले असून, भंगार गोळा करण्याच्या नावाखाली चोºयांचे सत्र वाढले आहेत.
औद्योगिक परिसरातील सावरदरी, वराळे, वासुली, भांबोली, शिंदे, महाळुंगे, खालुंब्रे, बिरदवडी, आंबेठाण आदी ठिकाणी अवैध पद्धतीने राजरोसपणे खुलआम हे धंदे चालू आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी संबंधित धंद्यांना चाप लावण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी हे धंदे राजरोस सुरू आहेत. एमआयडीसी भागात फक्त कचरा गोळा करण्याच्या नावाखाली छुप्या मार्गाने भंगार व्यवसाय जोरात सुरू आहे. लोकवस्ती असलेल्या ठिकाणी खुलेआम अजूनही चोºयाचे प्रमाण वाढले आहे. अवैध भंगार खरेदी-विक्री करण्याचे आणि गोळा करण्याचे काम सुरू आहे.
औद्योगिक पट्ट्यातील कारखान्यांतील भंगार माल उचलण्यासाठी या भागात कारखानदारी उभी राहिली तेव्हापासून स्पर्धा निर्माण झाली आहे. असे ठेके मिळविण्यासाठी स्थानिक व जिल्ह्यातील तरुण सक्रिय होऊन, भंगाराचे ठेके मिळविण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. व्यवसायाच्या ठेकेदारीसाठी किरकोळ धमकावण्याच्या घटना रोजच घडतात; परंतु नोकरी करायची असल्याने तक्रार करण्यासाठी कंपनीचे अधिकारी पुढे येत नाहीत. अनेक भंगार माफियांनीही औद्योगिक क्षेत्रात प्रचंड दबदबा निर्माण केला आहे. चाकण पोलिसांनी अनेकदा औद्योगिक परिसरातील नामचिन गुंडांसह भुरट्या चोरट्यांवर कारवाई केली होती; परंतु भंगार व्यवसायात आमाप पैसा मिळत असल्याने काही गुंडांनी आपले चांगलेच बस्तान बसवले आहे.
भंगार व्यवसायासाठी महामार्ग, हॉटेल व वजनकाटा यांच्या अगदी जवळ ही दुकाने उभारलेली पाहावयास मिळतात. या दुकानात काचेच्या किंवा प्लॅस्टिक बाटल्या, प्लॅस्टिक, पुठ्ठा इतर किरकोळ भंगार यांची खरेदी-विक्री होते. काही दुकानदार हे साहित्य गोळा करण्यासाठी परराज्यातून कामगार आणून त्यांना गावोगावी सायकलवर फिरवून असे भंगार गोळा करतात. परंतु, हे कामगार दिवसा फिरून भंगार गोळा करतात व रात्रीच्या वेळी टोळक्याने गोळा होऊन एखाद्या कारखान्यावर किंवा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावर हल्ला करून लोखंडाची चोरी करतात. दुकानातील माल व चोरी केलेला माल रात्रीच्या गाड्या भरून दुसरीकडे पाठविला जातो. या परराज्यातील चोरट्यांवर चाकण पोलिसांनी याआधी अनेकदा कारवाई केली आहे.
- औद्योगिक क्षेत्रातील भंगाराच्या व्यवसायात परप्रांतीयांबरोबरच स्थानिक गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असलेल्या लोकांचा समावेश असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. काही कारखान्यांतील भंगार उचलणारा परप्रांतीय असेल, तर त्याच्याकडून हप्तावसुली केली जात आहे. त्यामुळेच तालुक्यात गुंडगिरी वाढीस लागली आहे. चोरीच्या या भंगाराच्या धंद्यातून कित्येक माफियांनी करोडो रुपयांची माया गोळा केली आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये बिगरपरवाना भंगार व्यवसाय करणाºयांची संख्या खूप मोठी असून, अशा अवैध धंद्यावर कारवाईची मागणी होत आहे.
- औद्योगिक वसाहतीमध्ये वाढती भंगाराची दुकाने हा चिंतेचा विषय झाला आहे. कारखान्यातून निघणारे विविध प्रकारचे स्क्रॅप, प्लॅस्टिक व लोखंडाचे मटेरिअल, एमएस स्क्रॅप, इलेक्ट्रॉनिक कचरा इत्यादी वस्तूंचा साठा करून तो माल इतर ठिकाणी पाठविला जातो. बहुतेक दुकाने ही ग्रामपंचायतींच्या हद्दीत आहेत; परंतु त्यांना ग्रामपंचायतीने परवानगी दिली आहे का? या दुकानांची नोंद पोलीस ठाण्यात केली जाते का? हे तपासण्याची गरज आता निर्माण झाली आहे.