पुणे शहरातील रुग्णालयात ऑक्सिजन बेडचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना एका रुग्णालयातून दुसरीकडे स्थलांतरित करावे लागत आहे. अशा परिस्थितीत एका रुग्णवाहिकेने रुग्णाला स्थलांतरित करण्यासाठी तब्बल १९ हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामध्ये अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. परंतु शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा असल्याने रुग्णांना ते मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत रुग्ण गंभीर झाल्याने त्यांना स्थलांतरित करावे लागत आहे. अशा वेळी कार्डियाक रुग्णवाहिकेशिवाय रुग्णाला हलवणे अशक्य असते. चिंताजनक परिस्थितीत रुग्णवाहिका अवाच्या जवा दर लावून रुग्णांना अडचणीत आणत असल्याचे एका नागरिकाने लोकमतला सांगितले.
हेमंत जाधव यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याठिकाणी त्यांची परिस्थिती गंभीर होऊ लागली. तसेच नायडूमध्ये ऑक्सिजन बेडही उपलब्ध नव्हते. रुग्णाला तातडीने दुसरीकडे स्थलांतरित करावे. असे सांगण्यात आले. जाधव यांच्या परिवाराने शहरात रुग्णालये शोधण्यास सुरुवात केली. त्यांना आयुष रुग्णालयात बेड उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी जाधव यांचे मेहुणे विलास शेडगे यांनी नायडूच्या बाहेर कार्डियाक रुग्णवाहिका शोधण्यास सुरुवात केली. त्याठिकाणी त्यांना मोरया नावाची रुग्णवाहिका मिळाली. पण त्या ड्रायव्हरने रुग्णाला हलवण्याचे २० हजार होतील असे सांगितले. शेडगे यांनी त्याला पैसे कमी करण्याची विनंतीही केली. पण त्याने शेवटपर्यंत ऐकले नाही. शेवटी पर्याय नसल्याने रुग्णाला मोरया रुग्णवाहिकेतून आयुष रुग्णालयात आणले. त्यानंतर पैसे कॅश न देता गुगल पे करून ती पावती जवळ ठेवली. अशी माहिती रुग्णाचे मेहुणे विलास शेडगे यांनी दिली.
शेडगे यांनी नंतर मोरया रुग्णवाहिकेचे मालक सचिन भगत यांच्याशी साधला संपर्क सचिन भगत म्हणाले, आमच्याकडे अशी कुठल्याही प्रकारची रुग्णवाहिका नाही. तो ड्रायव्हरदेखील कोण आहे हे मला माहित नाही. माझी रुग्णवाहिका त्यादिवशी नायडूला गेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.