अमेरिकन कंपनीची गोपनीय माहिती फोडली :माजी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 09:26 PM2018-09-12T21:26:02+5:302018-09-12T21:30:11+5:30
अमेरिका येथील लोगान ब्रिटॉन इन्क या कंपनीची गोपनीय माहिती तिच्या ग्राहक कपंनीला पाठवून कंपनीचे १ लाख ८० हजार डॉलर (अंदाजे सव्वा कोटी) आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका माजी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.
पुणे : अमेरिका येथील लोगान ब्रिटॉन इन्क या कंपनीची गोपनीय माहिती तिच्या ग्राहक कपंनीला पाठवून कंपनीचे १ लाख ८० हजार डॉलर (अंदाजे सव्वा कोटी) आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका माजी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. कपिल जयभगवान जैन (रा़. ब्रम्हा सनसिटी, वडगाव शेरी) असे या ग्राहकाचे नाव आहे. ब्रिटॉन इन्क या कंपनीच्या वतीने भारत भूषण चुघ (वय ५६, रा़ द्वारका, नवी दिल्ली) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. चुघ हे दिल्लीतील अर्का ब्रिटॉन या कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत़. जैन हे गुप्ता यांच्या लोगान ब्रिटॉन इन्कमध्ये सोल्युशन आर्किटेक्ट व प्रिन्सिपल कन्सलटंट म्हणून २०१२ पासून काम करीत होते़. त्यांना दिलेल्या लॅपटॉपमध्ये कंपनीची संवेदनशील व गोपनिय माहिती दिली होती़ . ३१ जानेवारी २०१८ रोजी जैन यांनी मी सुट्टीवर जात असून २२ फेब्रुवारीला पुन्हा रुजू होईल, असे सांगून भारतात आले़. मात्र, त्यांनी आपल्याकडील लॅपटॉप परत केला नाही़ रुजू न झाल्याने २६ फेब्रुवारी १८ रोजी कंपनीने त्यांना कामावरुन कमी केले़.
ही कंपनी डेटा सोल्युशन या क्षेत्रामध्ये सेवा पुरवठा करते़. त्यांच्या कामगारांना ताशी किती पगार देते याची माहिती ग्राहक कंपनीला नसते़. कपिल जैन यांनी भारतात आल्यावर लोगान ब्रिटॉन इन्क कंपनीचे कर्मचारी असल्याचे दर्शवून कंपनी कामगारांना देत असलेल्या पगाराची माहिती त्यांच्या सेवा पुरविणाऱ्या कंपनीला दिली़. त्यावरुन यु़ एस़ सेल्युलर कंपनीला लोगान ब्रिटॉन इन्क कंपनीने अधिक नफा कमविला आहे, हे लक्षात आले़. ते मान्य नसल्याने त्यांनी लोगान ब्रिटॉन इन्क कंपनीबरोबरचा करार स्थगित केला़. त्यामुळे या कंपनीला सेवा देणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली़. तसेच कंपनीला यु़ एस़ सेल्युलर बरोबरचा करार रद्द होऊ नये, म्हणून यु़ एस़ सेल्युलरला १ लाख ८० हजार ७२०़ ५४ डॉलर एवढी रक्कम परत करावी लागली़ .कंपनीची गोपनीय माहिती गैरहेतूने पुरवून कंपनीचे आर्थिक नुकसान करुन विश्वासघात केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे़. चुघ यांच्या फिर्यादीवरुन येरवडा पोलिसांनी कपिल जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे अधिक तपास करीत आहेत़.