अमित भारद्वाजचे राज कुद्रांशी संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 02:12 PM2018-06-06T14:12:48+5:302018-06-06T14:12:48+5:30
बिटकॉइन संदर्भातील कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या अमित भारद्वाज आणि उद्योगपती राज कुंद्रा यांचे संबंध असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
पुणे : बिटकॉईनच्या माध्यमातून मोठा परतावा देण्याच्या अमिषाने हजारो लोकांची कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या अमित भारद्वाज आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्याशी संबंध असल्याचे काही पुरावे पुणे सायबर सेलच्या हाती लागले असून त्या आधारे सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी चौकशी केली आहे़ याप्रकरणात ईडीप्रमाणे पुणे सायबर शाखेकडून राज कुंद्रा यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अमित भारद्वाज, पंकज अदलखा आणि हेमंत भोपे यांच्यासह काही जणांवर पुण्यातील दत्तवाडी व निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर त्यांच्याविरोधात पुणे नांदेडसह ठाणे, चंदीगड, गुरगाव, कोलकात्ता येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता ते कोलकाता पोलिसांच्या ताब्यात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर निगडी पोलिसांत गुन्हा दाखल केल्यावर भारद्वाज बंधुंना सायबर गुन्हे शाखेने दिल्ली विमानतळावर अटक केली होती. पुण्यातील पोलीस कोठडीची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना नांदेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. यातील मुख्य आरोपी अमित भारव्दाज, पंकज अदलखा आणि हेमंत भोपे यांचा ताबा कोलकाता पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुणे सायबर गुन्हे शाखा आणि ईडी यांचा समांतर तपास सुरू आहे. पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अमित भारतद्वाजच्या आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्यासोबत काही संबंध असल्याचा पुरावे मिळाले आहेत. तसेच अटक आरोपींकडे सक्तसुवली संचलनालय (ईडी)च्या पथकाने चार दिवस कसून तपास केला. त्यानंतर उद्योगपती कुंद्रा यांचा भारव्दाज याच्या कंपनीशी काही संबंध आहे का याचाही तपास केला जात आहे. त्यांना यासाठी पुण्यात चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. मात्र, त्यांच्यामध्ये बिटकॉईन संदर्भात काय व्यवहार झाला आहे, हे उघड करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला़.
पुणे सायबर क्राईम सेलकडून बिटकॉईनचा तपास सुरु असताना ईडीबरोबर मिळालेल्या माहितीची देवाण घेवाण केली असून त्यातूनच ईडी अधिक चौकशी करीत आहोत़ त्यांच्या चौकशीनंतर गरज वाटली तर आम्ही राज कुंद्रा यांच्याकडे चौकशी करणार आहोत.
सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा
......................
पुणे सायबर सेलकडे २०५ तक्रारअर्ज
या प्रकरणात पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह दिल्ली आणि मध्यप्रदेशमधील इंदौर येथील तब्बल २०५ तक्रार अर्ज पुणे पोलिसांकडे आले आहेत. यामध्ये १७ कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचे नमूद केले आहे़.