राजगुरुनगर : बैलगाडा शर्यत हा केवळ शेतकऱ्यांचा नाद न राहता, केवळ मनोरंजन न राहता ग्रामीण संस्कृती आणि पर्यटनास चालना मिळेल असे चित्र भावी काळात दिसण्यासाठी बैलगाडा शर्यतींचा योग्य उपयोग झाला पाहिजे असं प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निमगाव (ता. खेड) येथे बैलगाडा घाटातील शर्यतीप्रसंगी व्यक्त केले. तर देशातील पहिला खासदार आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसून सहभागी झाला असल्याचे चित्र सर्वांनी पाहिले, अशी भावना नागरिकांमध्ये होती.
निमगाव खंडोबा येथे माघ पौर्णिमेनिमित्त भरलेल्या खंडोबाच्या यात्रेत लाखो भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. तर सकाळपासून मोठ्या प्रमाणावर घाटात नवसाचे बैलगाडे घाटात पळविण्यात आले. मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे आणि बैलगाडा शर्यतींवर बंदी यामुळे यात्रा भरविण्यात आली नव्हती. परंतु कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे आणि बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्याने मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी यात्रेत सहभाग घेतला.
शर्यती सुरू असतानाच अचानकपणे खासदार अमोल कोल्हे घोडीवर बसून घाटात आले, आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. या शर्यतीदरम्यान घोडीवर बसून त्यांनी वेगात घाट पार केला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. यानंतर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी म्हणून विविध प्रकारचे प्रयत्न अनेकांनी केले. अनेकांनी यात मोठा सहभाग घेतला अनेक पुरावे सादर केले. त्यामुळे या शर्यतींना परवानगी मिळाली आहे. हा विजय आपणा सर्वांचा आहे.
यानिमित्ताने निवडणुकीदरम्यान मी दिलेल्या शब्दातून, ऋणातून उतराई होण्याचा आनंद मला आज होत आहे असे खा. कोल्हेंनी सांगितले. परंतु बैलगाडा शर्यतीची ही लढाई अजूनही पूर्णपणे संपलेली नसून अंतिम लढत बाकी आहे. सर्वजण नियमावलीचे पूर्ण पालन करत आहेत याचा मला अभिमान आहे. अशा पद्धतीने अंतिम सुनावणीतही विजय आपलाच निश्चित होईल असेही ते म्हणाले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, सभापती अरुण चौधरी , उपसभापती वैशाली जाधव, नानासाहेब टाकळकर , विजयसिंह शिंदेपाटील, रामकृष्ण टाकळकर, संतोष गव्हाणे, नवनाथ होले आदी उपस्थित होते.