Pune: अफ्रिकन नागरिकाला अंमली पदार्थ विक्री करताना अटक, साडेचार लाखांचा माल जप्त
By विवेक भुसे | Published: January 9, 2024 04:18 PM2024-01-09T16:18:44+5:302024-01-09T16:20:29+5:30
आरोपी मुळचा अफ्रिकेतील अंगोला देशाचा रहिवासी आहे.
पुणे : कोंढव्यात अंमली पदार्थ विक्री करताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका अफ्रिकन नागरिकाला पकडले. त्याच्याकडून साडेचार लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. कोम्बो कार्मेलो मायेले (वय २७, रा. जाधवनगर, हांडेवाडी) असे त्याचे नाव आहे. तो मुळचा अफ्रिकेतील अंगोला देशाचा रहिवासी आहे. मायेले हा विद्यार्थी व्हिसावर गेल्या एक वर्षांपासून पुण्यात रहायला आहे. मात्र, तो कोठेही शिक्षण घेत नसल्याचे आढळून आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे व पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण व त्यांचे सहकारी कोंढवा परिसरात गस्त घालत असताना पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना तालाब समोर एक परदेशी नागरिक अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसानी सापळा रचून मायेले याला पकडले. त्याच्याकडून मेथक्यूलॉन १२ ग्रॅम, मेफेड्रोन (एम डी) ७ ग्रॅम तसेच दुचाकी, मोबाईल असा ४ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे , पोलिस उप निरीक्षक दिगंबर चव्हाण, योगेश मांढरे,सहायक फौजदार शिवाजी घुले व त्यांच्या सहकार्यांनी ही कामगिरी केली.