मॅट्रिमोनिअल साईटवर झालेली ओळख महागात; इंजिनियर तरुणीची ४० लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: April 12, 2024 05:16 PM2024-04-12T17:16:46+5:302024-04-12T17:17:13+5:30
भारतात लवकरच स्थायिक होणार असून, व्यवसाय सुरू करणार असल्याचे तरुणाने तरुणीला सांगितले
पुणे : विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेली ओळख संगणक अभियंता तरुणीला महागात पडली. चोरट्याने लग्नाच्या आमिषाने तरुणीची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत एका तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार राजेश शर्मासह साथीदारांविरुद्ध फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी खराडी भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत अभियंता आहे. तिने एका विवाह नाेंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. संकेतस्थळावर तिची राजेश शर्माशी याच्याशी ओळख झाली. शर्माने परदेशातील एका कंपनीत अधिकारी असल्याची बतावणी केली होती. शर्माने विवाहास होकार दिल्यानंतर त्यांच्यातील संपर्क वाढला.
त्याने लवकरच भारतात स्थायिक होणार असून, व्यवसाय सुरू करणार असल्याचे तरुणीला सांगितले. बनावट विमान प्रवासाचे तिकिट तिला पाठविले. त्यामुळे तरुणीचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर त्याने विमानाने दिल्लीत येणार असल्याचे सांगितले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर कस्टम विभागाने चौकशी सुरू केली आहे. परदेशी चलनाबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे त्याने सांगितले. तातडीने काही शुल्क जमा करावे लागेल, असे सांगून त्याने तरुणीला बँक खात्यात त्वरीत पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याने सांगितलेल्या बँक खात्यात तिने ४० लाख ५० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर शर्माने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.