पुणे : शहरातील रस्त्यांवर अनेक जण फाटलेल्या कपड्यांमध्ये फिरताना दिसत असतात. भिकारी किंवा वेडा असेल असं समजून जाणारा येणारा त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत असताे. परंतु समाजात असे काही देवदूत असतात की जे माणुसकी नेमकी काय असते याचा परिचय देत असतात. मुळचे केरळचे असलेले आणि पुण्यातील विश्रांतवाडी भागात रस्त्यांवरुन भटकत असलेल्या नेव्हीतील एका निवृत्त अधिकाऱ्याच्या आयुष्यात एक लाॅन्ड्रीवाला देवदूत बनून आला. वृद्धपकाळाने स्मृती कमी झालेले आजाेबा पुण्यातील रस्त्यांवर भटकत हाेते. त्यांना त्यांच्या घरच्यांपर्यंत पाेहचविण्याचे कार्य विशाल कांबळे या तरुणाने केले आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास एक वृद्ध व्यक्ती एका इमारतीच्या वाॅचमेनशी वाद घालत हाेती. हे माझे घर आहे असे ती म्हणत हाेती. वाॅचमन त्या व्यक्तीला हाकलत हाेता. हा सर्व प्रकार समाेरच असलेल्या लाॅन्ड्रीमध्ये काम करत असलेला विशाल बघत हाेता. त्याने जाऊन त्या आजाेबांची विचारपूस केली. त्यांना त्यांचे नाव सांगता येत नव्हते. ते हिंदी, इंग्रजी व तमिळमध्ये बाेलत असल्याने ते काय बाेलतायेत हे कळत नव्हते. या इमारतीत तिसरे घर माझे आहे असे ते म्हणत हाेते. विशालने त्याच्या ओळखीतल्या तमिळ भाषिक लाेकांना बाेलावून ते काय बाेलतायेत हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काही माहिती हाती लागली नाही. वृद्धपकाळाने काहीशी स्मृतीभंश झाल्याने त्यांना फारशी माहिती देता येत नव्हती. त्यांना विशालने माेबाईल नंबर विचारला तेव्हा त्यांना ताे सांगता येत नव्हता. विशालने त्यांना नंबर लिहीण्यास सांगितला. त्यांनी ताे त्याला लिहून दिला. विशालने त्या नंबरवर फाेन लावला तर समाेरील महिला तमिळमध्ये बाेलत हाेती. विशालने ताे फाेन त्या आजाेबांच्या कानाला लावला. क्षणार्धात त्यांच्या डाेळ्यातून अश्रू वाहू लागले. विशालने फाेनवरील महिलेशी संवाद साधल्यावर ते आजाेबा त्या महिलेचे वडील असल्याचे तिने सांगितले. तसेच काही महिन्यांपूर्वी ते केरळमधून हरवले हाेते असे तिने सांगितले. विशालने त्यांचा फाेटा त्या महिलेला पाठविला. ते तिचेच वडील असून ते निवृत्त नेव्ही अधिकारी असल्याचे तिने सांगितले. तसेच काही वर्षांपूर्वी ती व तिचे पती पुण्यात राहत हाेते. सध्या ते केरळमध्ये राहतात. तिच्या पतीचे मित्र पुण्यातील खडकवासला सीएमई येथे कामास आहेत. ते त्यांना घ्यायला येतील ताेपर्यंत त्यांना कुठे साेडू नका अशी विनंती त्या महिलेने केली.
त्यानंतर विशाल आणि विश्रांतवाडी मधील तारा मावशींनी त्यांना अंघाेळीसाठी पाणी तसेच चांगले कपडे दिले. तसेच या भागातील डाॅ. सीमा खंडागळे यांनी त्यांच्या जखमांवर मलमपट्टी केली तसेच त्यांची इतर तपासण्या केल्या. त्यांना या तरुणाने जेवण दिले. अखेर रात्री 9 च्या सुमारास त्यांच्या जावयाच्या काही मित्र येऊन त्या आजाेबांना घेऊन गेले. इतर लाेक विशालला वेड्यात काढून ही व्यक्ती वेडी आहे तिला पाेलिसांकडे दे असे त्याला सांगत हाेते. परंतु विशालने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आजाेबांच्या घरच्यांचा पत्ता शाेधून काढला. त्याच्या कार्यातून त्याने मानुसकी अजूनही जिवंत आहे हाच संदेश दिला. जाताना त्या आजाेबांनी विशाल साेबत फाेटाे काढण्याची इच्छा व्यक्त केली. तसा फाेटाेही त्यांनी काढून घेतला. तसेच त्याला एकदा तरी केरळला येण्याची गळ घातली. आज विशालने त्यांना ऐअरपाेर्टला साेडले व त्यांचा निराेप घेतला.