.... आणि पुण्याच्या महापौरांनी मागितली नागरिकांची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 09:34 PM2020-01-25T21:34:19+5:302020-01-25T21:35:11+5:30
ही माफी स्वत:च्या चुकीसाठी नव्हे तर पालिका प्रशासनातील एका लाचखोर अधिकाऱ्याच्या कामटाळू वृत्तीमुळे मागितली..
पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एका नागरिकांची चक्क माफी मागितली. परंतू, ही माफी स्वत:च्या चुकीसाठी नव्हे तर पालिका प्रशासनातील एका लाचखोर अधिकाऱ्याच्या कामटाळू वृत्तीमुळे मागावी लागली. महापौरांनी नागरिकाला होत असलेल्या त्रासाबद्दल माफी मागतानाच त्यांना कामाची ग्वाही देत दिलासाही दिला. महापौरांच्या या कृतीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
महापौर मोहोळ यांनी शनिवारपासून सुरु केलेल्या 'एफबी पे चर्चा ' मध्ये नागरिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे ऑनलाईन संवाद साधला. या लाईव्हमध्ये नागरिकांनी सर्वाधिक प्रश्न शहरातील वाहतुकीसंदर्भात विचारले. आपापल्या भागातील वाहतुकीची कोंडी, उड्डाणपुलांची आवश्यकता आणि वाहतुक पोलिसांची संख्या वाढविण्यासारख्या समस्या विषद केल्या. त्यावर महापौरांनी शहरातील नियोजित वाहतूक प्रकल्पांची माहिती देऊन नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
सोशल मिडीयाचा वापर करुन नागरी समस्या सोडविण्याकरिता असा अभिनव उपक्रम राबविणारे मोहोळ हे पहिलेच महापौर ठरले आहेत. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. कोथरूड, आझादवाडी येथील सरकारी सुतार दवाखाना येथील चौकात सतत वाहतूक कोंडी असते. त्यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात असे एका नागरिकाने सुचविले. नळस्टॉप चौक येथे दुहेरी उड्डाणपुलाचे काम आपण हाती घेतले तसेच इतर ठिकाणी उड्डाणपूल उभारून पुण्याची वाहतूक गतिमान करण्यात पुढाकार घ्यावा.तर शिवणे नांदेड मुठा नदीवर पूल व्हावा, शिवणे नवभारत चौकात ग्रेड सेपरेटर करावा, येथील अंतर्गत सोयीसुविधा कराव्यात अशी मागणी केली.
पालिकेच्या शाळेतील मैदाने क्रीडा संघांना मोफत उपलब्ध करु न द्याव्यात. पीएमपीएमएलच्या निवृत्त झालेल्या कर्मचाºयांची बंद असलेली पेन्शन न्यायालयाने सांगूनही सुरु करण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. ज्या भागात मोठया प्रमाणात लोकसंख्या वाढते आहे, अशा चांदणी चौक ते पिरंगुट पर्यंतच्या परिसराचा विचार करता मेट्रो मार्ग पिरंगुटपर्यंत वाढवावा. गुजराथ कॉलनी मधील व्यापारी आणि नागरिक रस्त्यावर बसलेल्या भाजीवाल्यांना वैतागले आहेत.
दहावी आणि बारावी चे पेपर जवळ येत आहेत, मुले वेळेत पोहचले पाहिजेत याकरिता वाहतूक पोलीस वाढवावेत अशा मागण्या केल्या. यासोबतच रस्त्यांवरील दिवे, झाडांच्या तुटलेल्या फांद्या, मुलांना खेळायला मैदान नाही, वाडा मालकांना स्वत: पुनर्विकास करण्यासाठी अर्थसहाय करावे असेही अनेकांनी नमूद केले.
याच चर्चेदरम्यान, विजय शर्मा नावाच्या नागरिकाने त्यांना सांगितले की, कर पावतीवरील नाव बदलण्याकरिता एक वर्षभरापासून चकरा मारत आहे. परंतू, हे काम करुन देण्याकरिता लाच मागितली जात आहे. लाच न दिल्याने काम रखडले आहे. यावर मोहोळ यांनी शर्मा यांची माफी मागत त्यांना सोमवारी कार्यालयात येण्यास सांगितले. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासोबतच काम करुन देण्याची ग्वाही दिली. या ऑनलाईन चर्चेदरम्यान मोहोळ यांनी फेसबुक संवादामधून समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगतानाच तक्रारदारांनी त्यांचे मोबाईल क्रमांक नमूद करण्याचे आवाहन केले. तसेच स्वच्छ भारत अभियानाची सविस्तर माहिती दिली. पीएमपीच्या बसेसच्या संख्येत वाढ केली जाणार असल्याचे मोहोळ यावेळी म्हणाले.