पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यातील राजभवनात भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले. अंकिता पाटील यांनी राज्यपाल यांना भेटल्याची फेसबुक पोस्ट केली आहे.
या भेटीप्रसंगी अंकिता पाटील यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती देणे बाबत, अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुनिश्चित धोरण ठरवून योग्य पद्धतीने प्रवेश करणे बाबत, इंजीनियरिंग व मेडिकल प्रवेश संदर्भातील पूर्व परीक्षांचे वेळापत्रक सुनिश्चित करून परीक्षा घेणे बाबत, तसेच संपूर्ण महाराष्ट्रसह पुणे ग्रामीण व विशेष करून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सक्तीने केली जाणारी वीज तोडणी थांबवण्याबाबत, राज्यपाल महोदयांना विनंती केली.
राज्यापालांचा पुणे दौरा
राज्यपाल कोश्यारी यांचा १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट असा तीन दिवसीय पुणे दौरा असणार आहे. काल देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते राजभवनात परिसरात ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्यपालांचा हा तीन दिवसांचा दौरा आहे. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हजेरी लावली. यावेळी राज्यपाल महोदयांनी पुरंदरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. तसंच अखंड आयुष्य शिवरायांप्रती वाहून घेतल्याने त्यांना धन्यवाद दिले.