पुणे : कथा, कादंबरी, पोवाडे आदींच्या माध्यमातून साहित्य व कला क्षेत्रात बहुमुल्य योगदान देणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कलादालन सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात साकार होणार आहे. बुधवारपासून (दि. ३१) साहित्यसम्राट अण्णा भाऊ यांच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने विद्यापीठाच्या अण्णा भाऊ साठे अध्यासनातर्फे हे कलादालन उभारले जाणार आहे.साहित्य व चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाआरंभानिमित्ताने विविध संस्था संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने शाहिर हेमंत मावळे यांना पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच अण्णा भाऊंच्या साहित्याचा, विचाराचा व कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अध्यासनातर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अध्यासनाचे प्रमुख संजय भंडगे म्हणाले, सिंबायोसिसतर्फे उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कलादालनाच्या धरतीवर त्यांचे कलादालन विद्यापीठात उभे करण्याबाबत अण्णा भाऊ यांचे नातू सचिन साठे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांचे साहित्य व त्यांनी वापरलेल्या वस्तू या कलादालनात ठेवण्यास त्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे पुढील काळात विद्यापीठात हे कलादालन उभे करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यात त्यांचे संपूर्ण साहित्य, लेखणी, कागद, चित्रपटाचे पोस्टर आदी वस्तू ठेवले जातील. या सर्व प्रक्रियेसाठी विद्यापीठ प्रशासन व अधिकार मंडळाची मान्यता घेतली जाईल.अण्णा भाऊंचे बहुतांश साहित्य प्रकाशित झाले असले तरी अजूनही काही कथा अप्रकाशित आहेत. येत्या वर्षभरात या अप्रकाशित कथा विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्याचा मानस आहे, असे नमूद करून भंडगे म्हणाले, अण्णा भाऊंच्या साहित्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे त्यांचे सर्व साहित्य वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासनाच्या अण्णा भाऊ साठे चरित्रसाधन प्रकाशन समितीतर्फे केला जात आहे. पुढील दोन-तीन महिन्यात अण्णा भाऊंचे साहित्य वेबपोर्टलवर उपलब्ध होईल.
विद्यापीठात उभारणार अण्णा भाऊंचे कलादालन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 7:00 AM
अण्णा भाऊ यांचे संपूर्ण साहित्य, लेखणी, कागद, चित्रपटाचे पोस्टर आदी वस्तू ठेवले जातील.
ठळक मुद्देअण्णा भाऊ साठे अध्यासनाचा पुढाकार : दोन महिन्यांत साहित्य येणार वेबपोर्टलवर