पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या विलगिकरण केंद्रांमध्ये चक्क आता मद्य आणि तंबाखू मिळू लागली आहे. याठिकाणी काम करणारे स्वच्छता कर्मचारीच दुचाकींचा डिकीमधून लपवून हा 'माल' जादा दराने पोचवीत असल्याचे उघडकीस आले आहे. बालेवाडी येथील निकमार विलगिकरण केंद्रामध्ये हा प्रकार तिसऱ्यांदा घडला असून सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
शहरात सध्या संस्थात्मक आणि गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या ३० हजारांच्या वर आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकरणात ठेवण्याकरिता पालिकेने शहराच्या विविध भागात विलगीकरण केंद्र सुरू केलेली आहेत. विविध शाळा, वसतिगृहे, मंगल कार्यालये आदी ठिकाणी ही विलगीकरण केंद्र आहेत. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारीत असलेल्या विलगीकरण कक्षातील स्वच्छता आणि जेवणाच्या दर्जाविषयी वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. काही विलगीरण कक्षात तर बाटलीबंद पाणी, उकडलेली अंडी आणि गरम पाणी विकत मिळत असल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. काही राजकीय पक्षांनी याविषयी आवाज उठविल्यानंतर प्रशासन जागे झाले.
यानंतर आता नवीनच प्रकार समोर आला आहे. विलगीकरण केंद्रांवरील स्वच्छतेसाही कंत्राटी पद्धतीने ठेका देण्यात आलेला आहे. विलगीकरण कक्षात असलेले काही जण स्वच्छता कर्मचाऱ्यांना हाताशी धरून राजरोसपणे विलगीकरणातच मद्यपार्ट्या करीत आहेत. दारूच्या बाटल्या आणि तंबाखूच्या पुड्या, गुटखा, पानमसाला अगदी सहज या विलगीकरण केंद्रामध्ये पोहचविला जात आहे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने काम करणारे स्वच्छता कर्मचारी मदत करीत आहेत. स्वतःच्या दुचाकींच्या डिकीमधून किंवा बॅगेमधून हा 'माल' केंद्रापर्यंत पोहचविला जात आहे. बालेवाडी निकमार येथे सुरक्षारक्षकांनी एका स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गाडीच्या डिकीची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
या डिकीमध्ये दारूच्या बाटल्या आणि तंबाखूच्या पुड्या असल्याचे निदर्शनास आले. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनीही याविषयी तक्रार केली आहे. परंतु, पालिकेकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून कारवाईची मागणी केली जात आहे.
----------
बालेवाडी निकमार केंद्रामध्ये हा प्रकार घडला असून यामध्ये रुग्णवाहिकांचे काही चालक, दिशा या कंत्राटदाराचे स्वच्छता कर्मचारी सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. यापूर्वीही दोन ते तीन वेळा असा प्रकार घडलेला असून त्यावेळी समज देण्यात आलेली होती. परंतु, असे प्रकार सतत घडू लागल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाईची शिफारस करणारा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे.
- संदीप कदम, क्षेत्रीय सहायक आयुक्त, बाणेर-बालेवाडी
----------
विलगीकरण केंद्रात व्यसनांचे सामान राजरोसपणे पोचविले जात असून अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत चढ्या दराने त्याची विक्रीही होत आहे. याला भ्रष्टाचार कारणीभूत असून वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नाही.
- स्नेहल देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या