पुणे : बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना डीएसके आर्थिक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर गुरूवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी व्यवस्थापनाला जाब विचारला. या सभेला बँकेच्या चार संचालकांनी दांडी मारल्यामुळे भागधारकांनी नाराजीही व्यक्त केली. आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बॅँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मराठे यांच्यासह बँक आॅफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनहोत (जयपूर), विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे (अहमदाबाद) या अधिकाऱ्यांना बुधवारी अटक केली. त्याचे पडसाद बँकेच्या गुुरुवारी (दि. २१) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पडले. सभेच्या सुरुवातीलाच बँक व्यवस्थापनाने याप्रकरणी निवेदन दिले. तसेच काही सभासदांनी मराठे यांच्या अटकेविषयी सहानुभुती व्यक्त केली. बँकेच्या आठ संचालकांपैकी मराठे आणि गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारच्या सभेत बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि अर्धवेळ अकार्यकारी संचालक सीए दीनदयाळ अग्रवाल उपस्थित होते. मात्र, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे प्रतिनिधी जी. श्रीकुमार, सरकार नियुक्त संचालक वंदिता कौल, भागधारकांचे संचालक आर. थामोधरन आणि अर्धवेळ अकार्यकारी संचालक अर्चना ढोलकिया यांनी मात्र सभेला दांडी मारली. बुधवारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर सर्व संचालकांनी सभेला हजेरी लावून भूमिका मांडणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी सभेकडे पाठ फिरविली. त्यामुळे भागधारकांमध्ये नाराजी होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अटकेनंतरही विशेष काही झाले नसल्याचा व्यवस्थापकांचा अविर्भाव होता. यापुर्वी मुनहोत यांच्या प्रकरणातही व्यवस्थापनाची अशीच भूमिका होती, असे बँकेचे भागधारक विवेक वेलणकर यांनी सांगितले. मराठे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याची भूमिका काही जणांनी मांडल्याचेही वेलणकर म्हणाले. बँकेत होणाऱ्या विविध घोटाळ्यानंतरही व्यवस्थापन कोणताही धडा घेण्यास तयार नाहीत. मराठे यांच्या नियुक्तीनंतर तुम्ही सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारखी भूमिका घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगितले होते. मात्र, त्यांनी काही केले नाही. त्यांच्या चुकीच्या कृतीमुळेच अटकेची कारवाई झाली. व्यवस्थापनाने कारभारात संपूर्ण पारदर्शकता ठेवायला हवी, असे भागधारक सुहास वैद्य म्हणाले.
बँक आॅफ महाराष्ट्रच्या ४ संचालकांची वार्षिक सर्वसाधारण सभेला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 6:58 PM
डीएसके आर्थिक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर गुरूवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी व्यवस्थापनाला जाब विचारला
ठळक मुद्देभागधारकांकडून नाराजी : संचालकांच्या अटकेवरुन व्यवस्थापनाला विचारला जाबवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अटकेनंतरही विशेष काही झाले नसल्याचा व्यवस्थापकांचा अविर्भाव