पिंपरी :आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानावेळी पोलिस आणि काही जणांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यात पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये काही जणांनी पोलिसांशी झटापट करत मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
मागील वर्षी पालखी सोहळ्यात गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली होती. अशा परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत तीन बैठका पार पडल्या. मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला. पालखी प्रस्थानावेळी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे यावर्षी मानाच्या ५६ दिंड्यांमधील प्रत्येकी ७५ वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून ठरवण्यात आले. मानाच्या दिंड्यांमधील तब्बल सव्वाचार हजारपेक्षा अधिक वारकरी, मंदिर समितीचे पदाधिकारी, वारकरी, इतर प्रमुख मंडळी, सुरक्षा राखणारे पोलीस असे सुमारे पाच हजार जणांनी मंदिर भरून गेले. त्यात पालखी प्रस्थानावेळी आणखी शेकडो जण मंदिरात घुसण्यासाठी प्रयत्न करीत होते. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे पोलिसांनी त्यांना मंदिरात सोडण्यासाठी विरोध केला.
दरम्यान, काही वारकऱ्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा व्हिडिओ समोर आला. यामध्ये पोलिस अडवण्याचा प्रयत्न करीत असताना शेकडो जणांनी अचानक पोलिसांना ढकलल्याचे दिसत आहे. तसेच पोलिसांना बाजूला सारत मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी जबरदस्तीने मंदिरात जाणाऱ्यांना बाजूला ढकलून पांगवले. त्यावेळचा एक व्हिडिओ सुरुवातीला समोर आला होता. त्यावरून पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र, त्यावेळचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात पोलिसांना बाजूला सारून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते.
अचानक काही जणांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते ऐकत नव्हते. बॅरिकेडूस तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यावेळी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केला नाही.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड