पुणे: मध्य रेल्वेच्या पुणे विभागात गेल्या दोन महिन्यांपासून घातपात घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू ठेवून अपघात घडवण्याचे प्रयत्न काही समाजकंटकांकडून सुरू आहेत. जवळपास 8 ते 10 वेळा असे प्रकार घडले. काही वेळा ट्रेनचं इंजिनदेखील रुळांवरुन घसरल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. मध्य रेल्वेचा पुणे विभाग 600 किलोमीटरचा आहे. या विभागात गेल्या दोन महिन्यांत अनेकदा रेल्वे रुळांच्या क्रॉसिंगदरम्यान लोखंडी वस्तू आढळून आल्या. रेल्वेचा अपघात व्हावा या उद्देशानं क्रॉसिंगदरम्यान या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातल्या रुकडी आणि हातकणंगले स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांमध्ये लोखंडाचा दांडा काही दिवसांपूर्वीच आढळून आल्याचं रेल्वे प्रशासनानं आपल्या पत्रकात म्हटल्याचं वृत्त 'बिझनेस स्टँडर्ड'नं दिलं आहे. रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू ठेवून घातपात घडवण्याचे प्रयत्न समाजकंटकांकडून सुरू आहेत. मात्र रेल्वे अधिकारी आणि लोको पायलट्सच्या सतर्कतेमुळे अद्याप कोणताही अनर्थ घडलेला नाही. कोल्हापूरसोबतच तळेगाव-कामशेत विभागातही रेल्वे रुळांमध्ये लोखंडी दांडा ठेवून अपघात घडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसच्या लोको पायलटनं दाखवलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला, असं रेल्वेनं पत्रकात नमूद केलं आहे. त्याआधी गेल्या वर्षी 2 डिसेंबरला मध्य रेल्वेनं एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. सातारा जिल्ह्यातल्या वठारमध्ये काही मुलांनी ट्रेनचा अपघात व्हावा यासाठी रेल्वे रुळांवर लोखंडी प्लेट ठेवली होती. त्या मुलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्या पालकांच्या चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती रेल्वेनं या पत्रकातून दिली होती.
चिंताजनक! पुणे विभागात 8 ते 10 वेळा ट्रेनच्या अपघातांचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 8:56 AM