लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला कुख्यात गुंड गजानन मारणे हा गुरुवारी दुपारी अचानक वडगाव येथील न्यायालयात हजर झाला. न्यायालयाने त्याला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. पुणे, पिंपरी पोलीस मारणे याचा शोध घेत असताना सर्वांची नजर चुकवून मारणे हा कोर्टात उपस्थित राहून जामीन घेऊन पुन्हा निघून गेला.
तळोजा कारागृहातून सुटल्यावर त्याच्या समर्थकांनी मुंबई -पुणे एक्स्प्रेस हायवेवर जंगी मिरवणूक काढली होती. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी मारणे व त्याच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काेथरूड पोलिसांनी मारणे व त्याच्या समर्थकांना अटक केली होती. या प्रकरणात न्यायालयाने मारणे याला जामीन मंजूर केला. त्यावेळी तळेगाव दाभाडे पोलिसांनी मारणे याचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळला होता. त्यानंतर हिंजवडी, वारजे, बंडगार्डन पोलीस ठाण्यात मारणे व त्याच्या समर्थकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे व पिंपरी पोलीस मारणे याचा शोध घेत होते. मुळशीतील फार्म हाऊसवर वारजे, हिंजवडी तसेच कोथरुड पोलीस गेले ३ दिवस वॉच ठेवून होते. तसेच अन्य ठिकाणीही त्याचा शोध घेत असताना अचानक गजानन मारणे हा वडगाव काेर्टात हजर झाला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला. त्यानंतर तो पुन्हा फरार झाला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.