पुणे जिल्ह्यांत ९१ सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती; टेट परीक्षा पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून विराेध
By प्रशांत बिडवे | Published: December 19, 2023 08:05 PM2023-12-19T20:05:00+5:302023-12-19T20:05:20+5:30
शिक्षण आयुक्तांनी या रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करावी असा आदेश
पुणे : शिक्षकांची रीक्त पदभरतीला विविध कारणांमुळे विलंब हाेत आहे. मात्र, त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान हाेउ नये यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यांत आठ तालुक्यांत ९१ सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे ३५ हजार शिक्षकांची पदे रीक्त आहेत. पवित्र पाेर्टलमार्फत शिक्षकभरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शिक्षण आयुक्तांनी या रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करावी असा आदेश ऑगस्ट महिन्यात दिला हाेता.
त्यास टेट परीक्षा पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून विराेध झाला हाेता. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने झेडपी शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी १७ ऑक्टाेबर राेजी जाहिरात प्रसिद्ध केली हाेती. त्यामध्ये पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे समक्ष अथवा टपालाने येत्या २६ ऑक्टाेबर पर्यंत अर्ज सादर करावेत असे नमूद केले हाेते. प्राप्त झालेल्या अर्जांतून पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रीक्त जागांवर तात्पुरत्या स्वरूपात वीस हजार रूपये मानधनांवर ९१ सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व शिक्षक ५८ ते ७० वयाेगटातील आहेत. नवीन शिक्षक रूजू हाेईपर्यंत किंवा यंदाचे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत दि. ३० एप्रिलपर्यंत कार्यरत राहणार आहेत.
या आठ तालुक्यात केली नियुक्ती
पुणे जिल्ह्यांतील ८ तालुक्यात सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक खेड २५, हवेली २१, मुळशी १४, भाेर १३, मावळ ९, वेल्हा आणि आंबेगाव प्रत्येकी ४ आणि जुन्नर १ असे एकुण ९१ शिक्षकांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांतून मागणी करण्यात आली नाही अशी माहिती जि.प. मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
बेराेजगाराच्या जखमेवर मीठ चाेळण्याचा प्रकार
राज्यात हजाराे उमेदवारांनी टेट परीक्षेतून स्वत:ची गुणवत्ता सिध्द केली आहे. मागील आठ ते दहा महिन्यापासून ते नियुक्तीची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे पदे भरण्यास राज्यशासन विलंब लावून सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करीत आहे हा प्रकार म्हणजे बेराेजगारांच्या जखमेवर मीठ चाेळण्याचा प्रकार आहे. - संदिप कांबळे अध्यक्ष, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना