पुणे : प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विविध अभ्यासक्रमाना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक संलग्न महाविद्यालयांनीविद्यापीठाकडे दहा टक्के वाढीव जागांसाठी अर्ज केला होता. त्यास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. राज्य मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल चांगला लागला आहे. त्यातच पुण्यातील विविध नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी येतात. त्यामुळे दरवर्षी महाविद्यालयांकडून वाढीव जागांची मागणी केली जाते. यंदाही पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे १० टक्के वाढीव जागांसाठी अर्ज केले होते. त्यास बुधवारी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. त्यामुळे प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.विद्यापीठ परिसराच्या सुशोभिकरणावरही व्यवस्थापन परिषदेत सविस्तर चर्चा केली. पाण्याचे व्यवस्थापन, झाडे लावणे व स्वच्छता याविषयी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी सविस्तर भूमिका मांडली. तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दोन ओपन जीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या एनएसएस वारीचा आढावा घेण्यात आला. तसेच वारीच्या निमित्ताने राबविलेल्या विविध उपक्रमात सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी केला.--विद्यापीठात सीएनजी बस सेवा मोफत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) च्या कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत आणि गो ग्रीन पुढाकारामुळे सीएनजीवर चालणाऱ्या दोन बसेस प्राप्त झाल्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यापीठाच्या आवारात विविध कामांसाठी येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना मोफत सेवा देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये घेण्यात आला. विद्यापीठाकडून सध्या प्रायोगिक तत्त्वावर बसची सेवा मोफत दिली जाणार आहे.व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली बसची सेवा सुरू करण्याबाबत समिती स्थापन केली होती. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार विद्यापीठात सीएनजी बसचे थांबे उभारले जाणार आहेत.--- बीटेक-एव्हीएशन अभ्यासक्रमाला मान्यता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे एम.टेक एव्हीएशन अभ्यासक्रम चालविला जात आहे. विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमास पसंती दिली जात आहे. आता बीटेक - एव्हीएशन अभ्यासक्रमास सुरू करणार असून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली.
महाविद्यालयांना वाढीव १० टक्के जागा देण्यास मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:08 PM
यंदाही पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे १० टक्के वाढीव जागांसाठी अर्ज केले होते...
ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेचा निर्णय : अनेक संलग्न महाविद्यालयांनी केला होता अर्ज