पुणे : ‘ए वन’ स्थानकाचा दर्जा असलेल्या पुणे स्थानकावर एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावरून बॅगा घेऊन जाण्यासाठी हमालांना ४०० ते ५०० रुपये भाडे द्यावे लागत आहे. व्हीलचेअरवरुन दिव्यांग अथवा ज्येष्ठांना घेऊन जाण्यासाठी ६०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत. एक फलाट ओलांडण्यासाठी पुणे स्थानकावर जेवढा खर्च होतो तेवढ्या खर्चात एखादा प्रवासी रेल्वेने पुण्याहून जम्मू-काश्मीरला पोहोचू शकतो.
दुर्दैवाने प्रवाशांना सहन कराव्या लागणाऱ्या मनमानीविरोधात रेल्वे प्रशासन कोणताही हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे प्रवासी आता ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवरून तक्रारी करू लागले आहेत तसेच लेखी तक्रारीही नोंदवू लागले आहेत. मात्र त्याचीही दखल रेल्वे प्रशासनाकडून अजून घेतली गेलेली नाही.
कोरोनाचा कहर कमी झाल्याने आता पुणे रेल्वे स्थानकावरून रोज जवळपास २०० गाड्या ये-जा करतात. स्थानकावरच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या लाखाच्या घरात आहे. प्रवाशांच्या या संख्येच्या तुलनेत हमालांची संख्यादेखील पुरेशी आहे. जवळपास १२० परवानाधारक हमाल पुणे स्थानकावर काम करतात. या हमालांनी गेल्या काही दिवसात विविध कारणे सांगत अघोषित भाडेवाढ केली आहे. प्रवाशांच्या बॅगा फलाट एकवरून तीनवर घेऊन जाण्यासाठी ३०० रुपये आणि चार व पाचवर जाण्यासाठी ४०० रुपये घेतले जातात.
सर्वात जास्त अडवणूक ही व्हीलचेअरवरून ये-जा करणाऱ्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांची होते. जास्त हमाल लागतात असे सांगून प्रवाशाची आर्थिक स्थिती व गरज लक्षात घेऊन अगदी हजार रुपयेसुद्धा केवळ या फलाटावरून त्या फलाटावर जाण्यासाठी उकळले जातात. या लुटीला विरोध केला तर दमदाटी, दादागिरी, भांडणे केली जातात. दोनच दिवसापूर्वी एका प्रवाशाने व्हीलचेअरसाठी हमालाने जास्त रक्कम मागितल्याची तक्रार स्थानक व्यवस्थापकांकडे केली आहे
रेल्वेचा निष्काळजीपणा, प्रवाशांची डोकेदुखी
लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणावरून स्थानकावरील रॅम्प बंद केले. ते अजूनही बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. शिवाय स्थानकावर केवळ दोनच सरकते जिने आहेत. लिफ्ट नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची सर्वात जास्त दैना उडते. जिन्यांचे काय करायचे याबद्दल रेल्वे प्रशासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. रॅम्प बंद असल्यानेच स्थानकावरील हमाल वाट्टेल ते भाडे प्रवाशांकडून उकळत आहेत.
रेल्वे प्रशासनाला प्रश्न
- हमाली दरपत्रक प्रत्येक फलाटावर प्रवाशांना दिसेल असे ठळक लावले आहे का?
- ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, मुले, आजारी व्यक्ती यांच्यासाठी अत्यावश्यक असणारे सरकते जिने, लिफ्ट, रॅम्प कार्यान्वित का नाहीत?
- हमालांची दादागिरी, मनमानी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन स्वत:हून पुढाकार का घेत नाही?