बासरीच्या सुराद्वारे वरुणराजाला घातली जातेय साद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 08:37 PM2018-10-29T20:37:14+5:302018-10-29T21:29:40+5:30
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात बासरीवादनाद्वारे पावसाला साद घालण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांचे राग मेघमल्हार वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयोग करीत आहेत.
चंद्रकांत साळुंके
काऱ्हाटी : प्राचीन काळात संगीतसम्राट तानसेन राग मेघमल्हार आळवून पाऊस पाडल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत. सध्या अशीच दंतकथा डिजिटलयुगात बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी अनुभवत आहेत. मात्र, ही दंतकथा अद्याप सत्यात उतरलेली नाही. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात बासरीवादनाद्वारे पावसाला साद घालण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांचे राग मेघमल्हार वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयोग करीत आहेत.
रॉय यांच्या प्रयोगातून रुसलेला पाऊस परतणार का, याबाबत जिरायती भागात चर्चा रंगली असून हा प्रयोग औत्सुक्याचा ठरत आहे. या परिसरात प्रथमच पाऊस पाडण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग सुरू आहे. काऱ्हाटी येथे २७ आॅक्टोबरपासून दुष्काळावर मात करण्यासाठी कऱ्हाड येथील इच्छापूर्ती गणेश मित्रमंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रयोगातून अनेक ठिकाणी पाऊस पाडण्याचे प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा रॉय यांनी केला आहे. त्याचअनुषंगाने या भागात सलग पाच वर्षांनी दुष्काळ असणाऱ्या भागाला पावसापासून दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. बासरीद्वारे मेघमल्हार रागाचे सूर सलग ७ दिवस वाजविण्यात येणार आहेत. यासाठी जवळपास दहा ते बारा स्पीकर लावण्यात आले आहेत. दिवस-रात्र बासरी वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. काऱ्हाटीजवळील साळुंकी मंदिराजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवस रात्र बासरी वाजवून या परिसराला मंत्रमुग्ध केले आहे. सध्या बासरी वाजवून पाऊस पडतो, या चर्चेमुळे प्रत्यक्ष बासरीवादन पाहण्यासाठी ग्रामस्थ, महिला आणि अनेक ठिकाणांहून या ठिकाणी भेट देत आहेत.
बासरीवादनाच्या प्रयोगामुळे पावसाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
बासरीवादनातून पाऊस पाडण्याचा प्रयोग येथे प्रथमच राबविण्यात येत आहे. यापूर्वी विमानाद्वारे आकाशात रसायने सोडून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग तालुक्यात राबविण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण राज्याचे केंद्रस्थान बारामतीत होते. सुमारे १५ वर्षांपूर्वी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग बारामतीमध्ये राबविण्यात आला होता. त्यापाठोपाठ बासरीवादनातून पाऊस पाडण्याचा प्रयोग होत आहे. गेल्या ६ वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिरायती भाग तहानलेला आहे. या पार्श्वभूमीवर बासरीवादनाच्या प्रयोगामुळे पावसाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
...तर अशा प्रयोगाची गरज भासणार नाही
बासरी वाजून पाऊस पडतोच. या ठिकाणीसुद्धा पाऊस पडेल. मात्र, सध्याचे वातावरण पाहता पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांनी सांगितले. मात्र, या भागांमध्ये वृक्षांची लागवड केल्यास भविष्यात अशा प्रयोगाचीदेखील गरज भासणार नाही. झाडांचे रक्षण केल्यास पुढील काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, अशी मला खात्री असल्याचे रॉय यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.