येरवडा: धानोरी परिसरात स्थानिक गुंडांकडून धारदार सत्रांचा धाक दाखवत व्यापारी व रहिवाशांना धमकावण्यासह खंडणी मागणे, महिला व मुलींची छेडछाड करणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. मकर संक्रातीच्या दिवशी अशाच गुंडांच्या टोळक्याने शस्त्राने दुकानांची तोडफोड करत दहशत निर्माण केली. एक गंभीर समस्या यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून विश्रांतवाडी पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींसह कोणीच या बाबतीत उपाययोजना करण्यास तयार नाही. अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी धानोरी मुंजाबा वस्ती परिसरातील नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे विश्रांतवाडी पोलिसांकडे केली आहे.
मागील काही दिवसांपासून या परिसरातील व्यापारी व रहिवासी स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींपासून त्रस्त आहेत. दारू पिऊन धिंगाणा करणे, दुचाकींचे आवाज काढणे, महिला व मुलींची छेडछाड करणे यासह स्थानिक व्यापाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. मकर संक्रातीच्या दिवशी स्थानिक महिला व मुली असताना अक्षय नवगिरे व प्रज्वल शिंदे व त्यांच्या साथीदारांनी शास्त्रांचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी लावून नागरिकांना त्यांच्या घरी जबरदस्तीने पिटाळले. या सर्व प्रकारामुळे स्थानिक नागरिक रहिवासी व व्यापारी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना नेमकं कोण मदत करते? कोणाच्या जीवावर ते दादागिरी करतात? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे. या गंभीर प्रकरणी स्थानिक नगरसेवक, आमदार अथवा कोणतेही लोकप्रतिनिधी यांच्याकडून दाद मिळत नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या दहशतीमुळे तक्रार देण्यासही कोणी धजावत नाही. भविष्यात या ठिकाणी मोठा गंभीर स्वरूपाचा गुन्हा होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.विश्रांतवाडी पोलिसांचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असून या प्रकरणी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.