आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे कोंबड्यांच्या खुराड्यात तासभर ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 06:06 PM2018-07-05T18:06:48+5:302018-07-05T18:12:34+5:30
हांडे- देशमुख वस्ती येथील राहत्या घराजवळील कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याने प्रवेश करून २० कोंबड्या फस्त केल्या़.
निरगुडसर : हांडे-देशमुख वस्ती येथे राजेंद्र गणपत हांडे यांच्या राहत्या घराजवळील कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याने प्रवेश करून २० कोंबड्या फस्त केल्या़. त्यानंतरही तो तासभर तेथे ठाण मांडून बसल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री दोन वाजता घडली़.
कोंबड्यांच्या ओरडण्याने राजेंद्र हांडे यांना जाग आली. त्यांनी खुराड्याजवळ जाऊन पाहिले असता त्यांना बिबट्या आतमध्ये असल्याचे दिसले़. त्याचवेळी बिबट्या त्यांच्यावर जोरात गुरकला़. त्यानंतर ते पळाले व शेजारील राहुल हांडे व मच्छ्रिंद्र हांडे यांना बोलावले़. त्यानंतरही बिबट्या आतमध्ये सुमारे एक तास बसून होता़. नंतर त्यांनी खुराड्याला चारही बाजुने पत्रे लावले.परंतु, तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला़. १५ मिनिटांनी तो त्या ठिकाणाहुन प्रयत्न करून बाहेर पडला व पसार झाला़.
माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांनी वन विभागाशी संपर्क करून सदर घटनेची माहीती दिली़ त्यानंतर वन विभागाचे वनअधिकारी पालवे मंगेश गाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़. उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, आनंदराव वळसे, शरद वळसे, संतोष वळसे, व ग्रा़मपंचायत सदस्य सपना हांडे, जयश्री थोरात, तसेच आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल हांडे यांनी वनविभागाने या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.