यवत : यवत येथे पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस निरीक्षकावर गोळीबार करून त्यांच्याकडील स्विफ्ट मोटार, मोबाईल व इतर महत्त्वाची कागदपत्रे पळविणा-या चार आरोपींपैकी दोन आरोपींना यवत पोलिसांनी आंध्र प्रदेश पोलिसांसह राजस्थानमध्ये जाऊन अटक केली आहे. त्यांच्याकडील स्विफ्ट मोटारदेखील या वेळी पोलिसांनी हस्तगत केली. चार आरोपींपैकी पोलीस निरीक्षक यांच्यावर गोळीबार करणारा मुख्य आरोपीचा मात्र आंध्र प्रदेश पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला, तर चौथा आरोपी अद्याप फरार असून, त्याचा तपास महाराष्ट्र, राजस्थान व गुजरातमध्ये सुरू असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.दौंड येथील नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस निरीक्षक महेश शिवलिंगाप्पा तिळगंजे (वय ५१, रा. यश प्रॉपर्टी मोरेवस्ती मांजरी, ता. हवेली) त्यांच्याकडील स्विफ्ट मोटार (एमएच १२ एनयू ९२४४) मधून पुणे-सोलापूर महामार्गावरून दि. १९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास सोलापूर बाजूकडे जात होते. त्या वेळी यवत गावच्या पुढे पॉवरहाऊससमोर पाठीमागून पांढºया रंगाच्या इर्टिगा मोटारीमधून आलेल्या चार अज्ञातांनी त्यांना मारहाण करून त्यांच्यावर पिस्तुलातून फायरिंग केले. तसेच त्यांना लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या वेळी त्यांची मोटार व मोबाईल हॅन्डसेट तसेच मोटारीमधील कागदपत्रे असा एकूण ७ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. भरसकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस निरीक्षकालाच लुटल्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला होता. या गुन्ह्याच्या तपासात हा गुन्हा क्र. जीजे २७/एएच ५२३३ मधील चार अज्ञातांनी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर यवत पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. गुन्ह्यातील आरोपींनी यवत येथे चोरी केलेली स्विफ्ट मोटार व त्यांच्याकडील मोबिलिओ कारचा वापर करून आंध्र प्रदेश राज्यातील ढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाºयाची साडेपाच कोटी रुपयांची रोख रक्कम लुटली. त्यांच्याकडील दाखल गुन्ह्यांची माहिती घेऊन पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला. तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, पुणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षिका डॉ. अश्विनी सातपुते, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल यादव, पोलीस नाईक दीपक पालके, गणेश पोटे, भिसे हवालदार, दशरथ बनसोडे, प्रवीण भोईटे, मनोज गायकवाड, संपत खबाले, विनोद रासकर यांनी केला.