पुणे : पैशांचा पाऊस पाडण्याच्या अमिषाने अंधश्रद्धेला बळी पडून जिवंत मांडुळांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन मांडुळ जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी ग्राहक असल्याचे भासवून त्यांना ताब्यात घेतले. गणेश वाफगावकर (वय १८, रा. नसरापूर, ता. भोर) आणि राजू बबन शिळीमकर (वय ४०, रा. मु़ पो. कुरंगवळी, ता. भोर) अशी त्यांची नावे आहेत.याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी माहिती दिली. कात्रज परिसरात दोन जण मांडुळ या सापाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस नाईक श्रीकांत वाघवले व इरफान मोमीन यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वनरक्षक स्वाती खेडकर व संभाजी धनावडे यांना याची माहिती कळविली. पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, आणि त्यांच्या पथकाने कात्रज चौकात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील बॅगेची तपासणी केली असताना त्यामध्ये १ किलो ५०० ग्रॅम आणि १ किलो ४०० ग्रॅम वजनाचे दोन मांडुळ आढळून आले.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पकंज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले, सहायक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, इरफान शेख, सचिन जाधव, तुषार खडके, हवालदार रिजवान जिनेडी, उमेश काटे, प्रकाश लोखंडे, राजू पवार, अशोक माने, महेबुब मोकाशी, राजाराम सुर्वे, सुभाष पिंगळे, गजानन सोनुने, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले यांनी केली आहे.राजू शिळीमकर हा शेतकरी आहे. गणेश वाफगावकर हा पदवीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून शिळीमकर यांच्या शेतात त्यांना दोन मांडुळ सापडले होते. त्यांची विक्री केल्यास भरपूर पैसे मिळतील, हे समजल्याने पैशाच्या आशेने दोन्ही मांडुळ घेऊन ते पुण्यात ग्राहकांचा शोध घेत होते. अमावस्येच्या दिवशी मांडुळे घरात ठेवल्यामुळे धनप्राप्ती होते, तसेच जमिनीमध्ये दडवून ठेवलेले गुप्तधन बाहेर येते, अशी लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे़ या मांडुळांची बाजारात ५० लाख रुपये किंमत आहे़ पण, त्यांची विक्री होण्यापूर्वीच ते दोघेही पोलिसांच्या तावडीत सापडले.
मांडुळ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, ५० लाखांचे दोन मांडुळ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 8:14 PM