आव्हाने पेलण्यासाठी कलावंतांचा एल्गार
By admin | Published: May 6, 2015 11:30 PM2015-05-06T23:30:07+5:302015-05-07T00:21:01+5:30
सांस्कृतिक पर्यायाचा शोध : सोमवारी साताऱ्यात ‘शाहिरी जलसा मानवमुक्तीचा’
सातारा : शोषणावर आधारलेल्या व्यवस्थेतून निर्माण झालेली आव्हाने पेलण्यासाठी राज्यभरातील युवा कलावंतांना एकत्र करण्याचा विडा ‘एल्गार कलामंच’ या संस्थेने उचलला आहे. पुण्यात मेअखेरीस पहिले सांस्कृतिक संमेलन होणार असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी साताऱ्यात येत्या सोमवारी (दि. ११) ‘शाहिरी जलसा मानवमुक्तीचा’ हा कार्यक्रम रंगणार आहे.
शाहू कला मंदिरात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी संस्थेचे अनिल म्हमाणे, धम्मरक्षित रणदिवे, शैलेश सावंत आदींनी बुधवारी पत्रकार परिषदेत घेतली. संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेचे कलावंत डफ घेऊन फिरत असून, बड्यांची देणगी न स्वीकारता कलावंतांचे संघटन करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. म्हमाणे म्हणाले, ‘साम्राज्यवादाच्या सध्याच्या युगात जगासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. बाजारू व्यवस्थेवर आधारित असलेल्या या जगात शोषण वाढले आहे. जात, धर्म, वर्ग, वंशाच्या आधारावर हे शोषण होत असून, त्याची परिणती म्हणून हिंसक संस्कृती निर्माण होत आहे. यातून मार्ग काढून मानवमुक्तीचा पर्याय द्यावा लागणार आहे. त्यासाठी सांस्कृतिक मार्गच इष्ट ठरेल.’ प्रतिनिधी)
सांस्कृतिक संमेलन पुण्याला
पुणे येथील शनिवार वाडा परिसरात दि. ३० व ३१ मे रोजी पहिले सांस्कृतिक संमेलन भरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून विविध क्षेत्रांतील कलावंत उपस्थित राहणार आहेत. कोणतीही औपचारिक बंधने न ठेवता कलावंतांना सादरीकरण करता यावे, अशा रीतीने संमेलनाचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती म्हमाणे यांनी दिली.