पुणे : प्रियकराचे १५ दिवसांपूर्वी लग्न झाल्याने तरुणीने त्याच्यासोबत असलेले संबंध तोडले. मात्र, लग्नानंतरही प्रियकराने तरूणीकडे पुन्हा रिलेशनमध्ये राहण्याची मागणी केली. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने तिला मारहाण करुन डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार सोलापुर-पुणे हायवेजवळ सोमवारी (ता. १५) संध्याकाळी सातच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून इम्रान हमीद शेख (रा. कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय फिर्यादी तरुणी आणि आरोपी यांच्यामध्ये मागील दहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, आरोपी इम्रानचे १५ दिवसांपूर्वी लग्न झाल्याने फिर्यादी तरुणीने त्याच्यासोबत असलेले रिलेशन संपवले होते. तसेच त्याच्यासोबत संपर्क देखील ठेवला नाही. इम्रान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तरुणीला तिच्या मोबाईलवर मेसेज करत होता. मात्र, तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केले.
इम्रान याने सोमवारी फिर्यादी तरुणीची यांची भेट घेऊन जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. माझ्यासोबत बोल, परत रिलेशन ठेव अशी मागणी केली. मात्र, तरुणीने याला नकार दिला. यामुळे चिडलेल्या इम्रान याने दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून तरुणीला कानशीलात लगावल्या. तसेच तुला मारून टाकतो अशी धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तरुणी खाली पडली असता इम्रान याने त्याठिकाणी पडलेला दगड उचलून तरुणीच्या डोक्यात मारला. यामध्ये तरुणीला गंभीर जखमी करुन आरोपी इम्रान पळून गेला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तरटे करत आहेत.