पुणे: एकीकडे पुण्यात मेट्रो आणली आहे. त्याने वाहने कमी होतील, असे तेच म्हणत होते, मग वेगळा रस्ता कशासाठी करायचा? असा सवाल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. शहरातील वाहने वाढत असतील तर ती कमी करण्यासाठी पीएमपी सक्षम करायला हवी. त्याने व मेट्रोने वाहने कमी कशी होतील, ते पहायला हवं. परदेशात देखील अर्बनायझेशन झाले आहे. पण तिथे अर्बनायझेशन मध्येही पार्क, हिरव्या जागा, बागा आहेत. तसे प्लान आपण करायला हवेत. मोबॅलिटी प्लान करून समस्या सोडवावी असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
आदित्य ठाकरे हे वेताळ टेकडीवर आज दुपारी पाहणी करायला आले होते. त्यांनी येथे होत असलेल्या प्रकल्पाविषयी माहिती घेतली. रस्ता कुठून जाणार आहे आणि त्यात किती झाडे कापली जातील, ते समजावून घेतले. यावेळी सुमिता काळे, प्राजक्ता दिवेकर, सचिन बहिरट, प्रदीप घुमरे, बाबा सय्यद, गौरी मेहेंदळे, राजकुमार खडके, पृथ्वीराज लिंगायत, परेश लोढा, योगेश आळंदकर, सारंग यादवाडकर आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, वेताळ टेकडी असो किंवा नदीकाठ सुधार योजना यामुळे बेताल विकास सुरू आहे. शाश्वत विकास करणे आवश्यक आहे. अर्बनायझेशन वाढले म्हणजे कसेही रस्ते काढणे नव्हे, मोबॅलिटी प्लान करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा, जगभरात अर्बनायझेशन झालेल्या शहरात उद्याने, पार्क आहेत, तसे आपल्याकडे व्हायला हवे. मी पुण्यात होत असलेल्या वेताळ टेकडीवरील आणि नदीकाठ सुधार प्रकल्पाविषयी माहिती घेतली. सध्या जनतेच्या विरोधात हुकुमशाही सुरू आहे. कोणी सत्य बोललं की त्याला अॅक्टिव्हिस्ट बोलून टीका केली जाते. खरंतर नदीकाठ सुधार जो प्रकल्प सुरू आहे, त्याबाबत माहिती घ्यायला हवे की सर्व नद्या सारख्या नसतात. अगोदर नदीची स्वच्छता करायला हवी, मग सुशोभीकरणाचे पहायला हवे. बाहेरील सल्लागार शहराविषयी काहीही सल्ला देतात आणि वाट लावतात, स्थानिक लोकांना याविषयी समजून घ्यायला हवे. त्यांना तिथली अधिक माहिती असते. माहिती अधिकारात आलेल्या माहितीमध्ये आणि राजकीय नेते यांच्यातील माहितीत तफावत आहे. प्रकल्पाची परवानगी घेताना झाडं कापणार नाही, असे सांगितले होते. पण नंतर सात हजार झाडं कापली जाणार असे सांगितले गेले. ही दिशाभूल केली जात आहे.