पुणे : पुण्यातील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आशा सेविकांनी आंदोलन सुरू केलं आहे. आशा सेविकांनी १५ जूनपासून सुरू केलेल्या संपाचा भाग म्हणून हे आंदोलन होते आहे. जवळपास पाचशेहून अधिक आशा सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील ६६ हजार आशा सेविका व ४ हजार गटप्रवर्तक यांनी १५ जूनपासून राज्यभरात संप सुरू केला आहे. आशा स्वयंसेवकांना कराव्या लागत असलेल्या माहितीचे संकलन, अहवाल सादरीकरण ,लसीकरण अशा सगळ्या कामाची दरमहा चार हजार रुपयांची रक्कम पूर्णपणे मिळत नाही. याच बरोबर आशा सेविकांना या कामा व्यतिरिक्त अन्य ७२ कामे करावी लागतात. आणि त्या कामाचा मोबदला त्यांना साधारणपणे २५०० रुपये मिळतो. पण कोरोना काळात त्यांना ८ तास काम करावे लागत असल्यामुळे ही रक्कम मिळणे बंद झाले. सध्या त्यांना दररोज आठ तास काम करून सुद्धा ५ हजार रूपयांपेक्षा कमी मानधन मिळते आहे. कोरोना महामारी च्या काळात त्यांच्याकडून अधिक काम देखील करून घेतले गेले आहे. मात्र या कामाचा मोबदला म्हणून या आशा स्वयंसेविकांना काहीही पैसे देण्यात आले नाहीत.
याच पार्श्वभूमीवर कोरोना काळात केल्या गेलेल्या या कामासाठी एप्रिल पासून प्रतिदिन पाचशे रुपये मिळायला हवेत, तसेच त्यांना अँड्रॉइड मोबाईल दिले जावेत, कोरोनाबाधित होऊन मृत्यू पावलेल्या आशा सेविकांच्या वारसांना सरकारी नोकरी मिळावी तसेच त्यांची मासिक प्राप्ती किमान वेतन एवढी व्हावी या मागण्यांसाठी आशा सेविका न कडून आंदोलन केले जात आहे. आज सकाळपासूनच जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आशा सेविकाकडून आंदोलन केले जाते आहे.