वाल्हे (पुणे) : कोळियाची कीर्ती वाढली गहन! केले रामायण रामा आधी! महर्षी वाल्मीकींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हेनगरीमध्ये भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींच्या वाल्हेनगरीत विसावला.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून प्रवास करताना भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेत वाल्हेनगरीकडे मार्गस्थ होतानाच सकाळची न्याहरी सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीमधील दौंडज खिंडीमध्ये घेऊन क्षणभर विश्रांती घेत, वाल्हेनगरीकडे मार्गस्थ झाला.
सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास दौंडज ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सीमा भुजबळ, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत, सदस्य पोलिस पाटील दिनेश जाधव ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दरम्यान, सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पालखीचा नगारखाना व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हेनगरीत दाखल झाला. दरम्यान, ग्रामस्थ व तरुणांनी, पुष्पवृष्टी करीत ‘माउली माउली’चा जयघोष करीत, तर वाल्हे येथे माउलींचे जोरदार स्वागत केले. चोपदारांनी सूचना केल्यानंतर वैष्णवांच्या उपस्थितीत समाज आरती झाली.
आरतीनंतर भाविकांनी दुतर्फा रांगा लावून माउलींचे दर्शन घेण्यास सुरुवात झाली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी सकाळी साडेसहा वाजता नीरा नदीत पवित्र स्नान करून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. संध्याकाळी लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.