मराठीच्या जतनासाठी अशोक चव्हाण सरसावले : विनोद तावडे यांना लिहिले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 08:52 PM2018-09-05T20:52:22+5:302018-09-05T20:53:17+5:30
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे.
पुणे : मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे. याबाबतचे पत्र शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना पाठवण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने डॉ. श्रीपाद जोशी यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संदर्भातील मागण्यांबाबतचे निवेदन विनोद तावडे यांच्याकडे पाठवले होते. या निवेदनाबद्दल योग्य ती कार्यवाही करावी, असे चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे. या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष वेधत या प्रयत्नांना बळ पुरवले जाण्याची नितांत गरज आहे, असेही म्हटले आहे.
महामंडळाने मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनासाठी अडीच वर्षात सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामधील सुमारे ३० सूचना, मागण्या, निवेदने, ठराव यांचे स्वरुप या निवेदनात विषद करण्यात आले आहे. यामध्ये विधानपरिषदेवरील घटनाबाह्य नियुक्त्या रद्द करणे, ८४ वर्षे प्रलंबित मराठी विद्यापीठाची मागणी, राज्याचे अद्याप जाहीर न झालेले भाषा धोरण, मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीबाबतची श्वेतपत्रिका, अनुवाद अकादमी आणि बोली विकास केंद्राची स्थापना, अभिजात दर्जासंबंधी चाललेली चालढकल, बंद पडर असलेल्या प्राथमिक शाळा, बृहनमहाराष्ट्रासाठी स्वतंत्र भाषा धोरण, राज्य सांस्कृतिक विकास महामंडळाची स्थापना आदींचा समावेश आहे. मराठी भाषेबाबतच्या मागण्या शासन दरबारी पडून असून त्यांच्या पुर्ततेसाठी प्रत्यक्ष राजकीय कृती करण्याचे आवाहन जोशी यांनी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना केले आहे. याबाबतचे पत्र पाठवल्यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्याचे जोशी यांनी सांगितले.