पुणे - या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आल्याने भाविकांनी दर्शनासाठी जिल्ह्यातील अष्टविनायकाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांच्या सोईसाठी विविध सोई देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात होता. दुपारी उन वाढल्यानंतर हा ओघ ओसरला. मात्र, संध्याकाळनंतर पुन्हा दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढली. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी दर्शनवारीच्या वर मंडप लावण्यात आले होते.महागणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविक रांजणगाव गणपती - येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या महागणपतीचे अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून हजारो गणेश भक्तांनी भक्तिमय वातावरणात पहाटेपासून दर्शन घेतल्याची माहिती श्री रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष दुंडे व सचिव प्रा. नारायण पाचुंदकर यांनी दिली. उन्हाची तमा न बाळगता भाविकांनी आपल्या लाडक्या महागणपतीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.अंगारकीनिमित्त पहाटे ५ वाजता महागणपतीची पूजा, अभिषेक करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळची आरती, दुपारी १२ वाजताची महापूजा, महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंगळवारी येणाºया चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाते. या वर्षभराची पहिली अंगारकी चतुर्थी असून भाविकांच्या अलोट गर्दीमुळे महागणपतीची प्रतिमा असलेल्या नाणी विक्री, तसेच मोदक विक्रीस प्रंचड प्रतिसाद मिळाल्याचे उपाध्यक्ष अॅड. विजयराज दरेकर यांनी सांगितले.अंगारकी चतुर्थीनिमित्त अनेक महिला भाविकांनी सुमारे २० ते २५ कि मी अंतर पायी चालून श्रद्धापूर्वक महागणपतीचे दर्शन घेतले. रांजणगावचे सर्व रस्ते, तसेच देवस्थान परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. दर चतुर्थीला प्रगतिशील शेतकरी नानासाहेब दिनकर पाचुंदकर यांनी अर्पण केलेल्या फुलांची आकर्षक सजावट, महागणपतीने परिधान केलेली आकर्षक वेशभूषा व अंलकार भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. अहमदाबाद (गुजरात) येथील कॅप्सन रिसोर्सेस कॉर्पोरेशन या कंपनीने देवस्थानला भाविकांच्या सोयीसाठी ३२ हजार रुपये किमतीचा कुलर भेट दिला. प्रशस्त वाहनतळ, भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून खाली मॅट व वर आच्छादित दर्शनरांग, रेलिंग, दर्शनरांगेत कुलर, पिण्याचे पाणी, मोफत खिचडीवाटप आणि विश्रांतीसाठी स्वानंद उद्यान यामुळे भाविकांना महागणपतीचे दर्शन घेणे सुलभ झाल्याचे व्यवस्थापक बाळासाहेब गोरे यांनी सांगितले.देवस्थान कर्मचाºयांच्या वतीने भाविकांना मोफत लिंबू सरबतवाटप करण्यात आल्याचे जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके यांनी सांगितले. अंगारकीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रांजणगावचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, होमगार्डसह बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पाऊण लाख भाविकांचे मयूरेश्वराचे दर्शनमोरगाव : अष्टविनायक तीर्थस्थान मोरगाव (ता. बारामती) येथे आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे ४ वाजल्यापासून मयूरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. अंगारकी केल्याने बारा चतुर्थीचे पुण्य मिळते, अशी आख्यायिका असल्याने जिल्ह्यासह राज्यभरातून रात्री उशिरापर्यंत पाऊण लाख भाविकांनी मयूरेश्वराचे दर्शन घेतले.अंगारकी चतुर्थीच्यानिमित्ताने मंगळवारी पहाटे गुरव मंडळीची पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा खुला करण्यात आला. वर्षातील ही पहिलीच अंगारकी आहे. यामुळे सातारा, सांगली, अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद, ठाणे आदी भागांतून भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते.चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सावलीसाठी मंडप, पिण्यासाठी, पाय भाजू नये, म्हणून मॅट, सुरक्षारक्षक, सफाई कामगार आदी सोय उपलब्ध केली होती. मोरगाव येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. बाळासाहेब सोनवणे, डॉ. विनया सोनवणे व चिंचवड देवस्थानच्या वतीने मयूरेश्वर मंदिरात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून दिली होती. याचा लाभ सुमारे ३५० पेक्षा अधिक भाविकांनी घेतला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या सुविधेमुळे समाधान व्यक्त केले. चतुर्थीमुळे सकाळी ७ वाजता दुपारी १२ वाजता व रात्री चंद्रोदयाच्यावेळी नैवेद्य श्रींस दाखवण्यात आला. दिवसभरात माळेगाव कारखान्याचे चेअरमन रंजन तावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी जि. प. सदस्य विराज काकडे आदींनी दर्शन घेतले. फलटण येथील काही भाविक सायकलवर व बारामती येथील काही महिला भाविक अनवाणी चालत मयूरेश्वरदर्शनासाठी आले होते.ओझर येथे विघ्नहराच्या मूर्तीला फुलांची आरास ओझर : अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांतील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर येथील विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सुमारे दीड लाख भविकांनी ‘श्रीं’च्या दर्शनाचा लाभ घेतला, अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली.पहाटे चारला देवस्थानचे पुजारी हेरंब जोशी यांनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी यशवंत कवडे, खजिनदार किसन मांडे, सचिव गोविंद कवडे ,विश्वस्त देविदास कवडे, पांडुरंग जगदाळे, बाळासाहेब कवडे, विक्रम कवडे, प्रकाश मांडे, साहेबराव मांडे, बबन मांडे, अनिल मांडे, शंकर कवडे, ज्ञानेश्वर कवडे ग्रामस्थ अविनाश जाधव, तसेच प्रमुख नरेंद्र पाठक, उद्योजक कल्याण यांच्या हस्ते ‘श्रीं’चा अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.सकाळी ७.३० वाजता महाआरती करण्यात आली, १२.०० मध्यान्ह आरती करण्यात आली. ८.०० वाजता नियमाचे पोथी वाचन करण्यात आले. आलेल्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टने वाहनतळ व्यवस्था, दर्शनरांग, उन्हापासून संरक्षणासाठी मंडप, पिण्याचे थंड पाणी, खिचडी वाटप, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमीवृक्षाखाली व्यवस्था, दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर बाग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था केली होती.या निमित्ताने प्रवेशद्वार ते वाहनतळ गर्दीचे नियोजन करण्यात आले. पेढ्यांची दुकाने, खेळणी, संसारपयोगी वस्तू, हार-फुले, कटलरी ही दुकाने मांडली गेली. त्यामुळे यात्रेचे स्वरूप आले. या दरम्यान निष्काम सेवा आळंदी या संस्थेच्या सेवकांनी मंदिर व मंदिर परिसराची स्वच्छता केली. नियमित हरिपाठ करण्यात आला ९.३२ ते चंद्रोदयापर्यंत ह.भ.प शिवनेर भूषण विठ्ठलबाबा मांडे यांचे हरिकीर्तन झाले.त्यांना साथसंगत रामप्रसादिक भजन मंडळ शिरोली खुर्द यांनी दिली. वारकºयांना अन्नदान रंगनाथ बाबुराव रवळे यांनी केले. ७.३० ते ११ पर्यंत २ हजार भाविकांना खिचडी वाटप करण्यात आले.महाप्रसादाचे देणगीदार प्रवीण अनंतराव चौगुले, जयंत म्हैसकर, शिवाजी माणिक ढाकणे, अरविंद भालेराव,अंबादास सुत सोनकर यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, विजय फड, नीलेश कोकाटे, लक्ष्मीताई जावळेकर यांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले.गिरिजात्मजाच्या मूर्तीला आकर्षक सजावटजुन्नर : अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या औचित्याने अष्टविनायक क्षेत्र लेण्याद्री येथे गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात जवळपास २० ते २५ हजार गणेशभक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.पहाटे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद मेहेर, उपाध्यक्ष कैलास लोखंडे यांच्या हस्ते श्री गिरिजात्मजास अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे सचिव शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त काशीनाथ लोखंडे, जयवंत डोके, संजय ढेकणे व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते. सकाळी नऊपर्यंत गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले. नऊनंतर उन्हाचा तडाखा वाढल्याने गणेशभक्तांचा दर्शनासाठी ओघ कमी झाला. संध्याकाळी ६ नंतर ऊन कमी झाल्यावर पुन्हा गणेशभक्तांची गर्दी सुरू झाली. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी ६ वाजता व दुपारी १२ वाजता महाआरती करण्यात आली. देवस्थान ट्रस्टचे वतीने भाविक भक्तांना खिचडीवाटप करण्यात आले. सायंकाळी मंदिरात श्री मुक्ताई भजनी मंडळ, शिवेची वाडी यांचे भजन झाले. चंद्रोदयाच्या वेळी श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. दिवसभरात विविधधार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.जुन्नर तालुक्यास मिळालेल्या विशेष पर्यटन क्षेत्राच्या दजार्बाबत देवस्थान ट्रस्टचे वतीने आमदार शरद सोनवणे यांचे आभार मानण्यात आले. पर्यटनस्थळांचा विकास होत असताना त्यांचे संवर्धन होणे ही गरजेचे आहे. पर्यटकांना विविध आवश्यक सेवा व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. पर्यटनस्थळांना जोडणारे रस्ते चांगले होणे गरजेचे असून त्याठिकाणी जाण्याकरिता वाहनसेवा सुरू केली पाहिजे.श्री चिंतामणीला विधिवत पूजाथेऊर : उन्हाची तीव्रता जास्त असूनही नववर्षातील पहिल्याच अंगारकी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांसमवेत पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने थेऊरगावाला जत्रेचे स्वरूप आले होते.
भाविकांनी घेतले अष्टविनायकांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 2:26 AM