पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र करणारा संचालक अश्विनीकुमार याने जी ए सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याला तब्बल २ कोटी रुपये दिल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागाचा उपसचिव सुशील खोडवेकर याची गणेशन याने तीन वेळा भेट घेतली होती. खोडवेकर याच्याकडे परीक्षांसंबंधी काहीही अधिकार नसताना तो खोडवेकर याला कशासाठी भेटला याचा शोध सायबर पोलीस घेत आहेत.
जी ए सॉफ्टवेअरचे २०१८ मधील संचालक अश्विनकुमार याने राज्य परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे यांच्याशी संगनमत करुन टीईटीमध्ये पात्र नसतानाही परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र केले होते. अश्विनकुमार याने तपासात तुकाराम सुपे यांनाही ३० लाख रुपये दिल्याची कबुली दिली होती. त्याचबरोबर जी ए सॉफ्टवेअरचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेशन याला २ कोटी रुपये दिल्याचे सांगितले आहे. अश्विनकुमार याच्या घराची झडती घेतली तेव्हा पोलिसांनी एक कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, हिरे, जडजवाहीर व चांदीच्या वस्तू जप्त केल्या होत्या.
गणेशन याचाही टीईटी परीक्षा गैरव्यवहारात हात असल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी त्याला ई मेलद्वारे नोटीस पाठविली होती. त्यावर त्याने बंगलोर येथील न्यायालयात धाव घेऊन ट्रान्झीट बेल मिळविला. त्यानंतर तो सायबर पोलिसांपुढे हजर झाला होता. आपण पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे दाखविण्यासाठी गणेशन हा पोलिसांपुढे हजर राहिला. प्रत्यक्षात पोलिसांनी त्याला विचारलेल्या प्रश्नांना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली असून अश्विनकुमार याने आपल्याला पैसे दिल्याचे नाकारले आहे. त्याचबरोबर आपल्याला हे महाराष्ट्रात अशा प्रकारे परीक्षेत गैरव्यवहार करीत असल्याची कल्पना नसल्याचा दावा पोलिसांपुढे केला आहे. सुशील खोडवेकर याच्याकडे टीईपी परीक्षेविषयीचे कोणतेही अधिकार नसताना गणेशन याने त्याची ३ वेळा भेट घेतली होती. जी ए सॉफ्टवेअरला काळ्या यादीतून काढण्यासाठीच सुपे याच्यावर दबाव आणण्यासाठीच ही भेट घेतली असल्याची शक्यता आहे.
काळ्या यादीतून काढण्यास इतरांचा होता विरोध
राज्य शिक्षण परीषदेचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे याने सुशील खोडवेकर याच्या दबावातून जी ए सॉफ्टवेअरला काळ्या यादीतून काढले होते. राज्य शिक्षण परीषदेच्या इतर सदस्यांचा काळ्या यादीतून जी ए सॉफ्टवेअरला बाहेर काढण्यास विरोध होता. सुपे याने आपला अध्यक्षीय अधिकार वापरला होता.