येरवडा : वडगाव शेरी येथील शालेय विद्यार्थिनी वरील प्राणघातक हल्ल्याच्या घटनेची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
वडगावशेरी येथील पीडित विद्यार्थिनीची त्यांनी पुण्यातील खासगी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच तिच्या योग्य उपचार व तपासासाठी सूचना दिल्या. शिर्डीत विद्यार्थिनीच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील त्यांनी यावेळी पोलिस प्रशासनाला दिले. अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बडीकोप, निर्भया पथक या यंत्रणा सक्षम पणे राबविण्यात येतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच शाळांमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षमपणे राबविण्यासाठी देखील सूचना दिली.
सध्या पीडित विद्यार्थिनीची प्रकृती व्यवस्थित असून अद्याप तिचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही. तिला योग्य ते उपचार व इतर आवश्यक मदत मिळावी यासाठीचे सूचना प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. तसेच तुमची दहावीची परीक्षा देण्याची इच्छा असेल तर तिला विशेष बाब म्हणून लेखनिक पुरवला जाईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या गंभीर प्रकरणात विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळा प्रशासनावर आरोप केले आहेत. हल्ल्याच्या घटनेनंतर सुमारे वीस मिनिटं विद्यार्थ्यांनी रक्ताच्या थारोळ्यात शिक्षकांसमोर शाळेच्या आवारात पडून होती. घटना घडत असताना शाळेतील सुरक्षारक्षक किंवा इतर कोणीही आरोपीला अटकाव केला नाही. तसेच त्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली नाही. यामुळे सदर घटनेत शाळा प्रशासनावर देखील चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बाल विकास विभागाला अजूनही आली नाही जाग
वडगावशेरी येथील दहावीच्याविद्यार्थीनी वर प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटनेला चोवीस तास उलटून गेले तरी देखील बालविकास विभागाला अद्याप जाग आलेली नाही. एक गंभीर घटनेनंतर बालविकास विभागाचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी किंवा पालकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी मंगळवारी सकाळी घेऊन थेट रुग्णालयात जाऊन पीडित विद्यार्थ्यांची व तिचा पालकांची भेट घेतली. मात्र बालविकास विभागाचे कोणतेही अधिकारी त्यांच्या पालकांना अद्याप भेटलेले नाहीत. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार पक्ष सह पीडित विद्यार्थिनीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र त्याची कोणतीही दखल बालविकास विभागाने घेतलेली दिसत नाही. तिला आवश्यक तातडीची वैद्यकीय व इतर मदत बालविकास विभागाकडून होणे आवश्यक होते. मात्र महिला आयोगाकडून संबंधित खात्याला याबाबत तातडीने मदत करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा बालविकास विभागाची अशा गंभीर घटनांमध्ये अनास्था दिसून येत आहे.