पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याने पलायन केल्यानंतर आता येथे आरोपींच्या सुरक्षेकरीता दिवसपाळी व रात्रीपाळीकरता पोलीस मुख्यालय, कोर्ट कंपनी व पोलीस ठाण्याकडील गार्डची नेमणूक करण्यात येत आहे. या गार्डवर सहायक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची निगराणी राहणार आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या पलायनामुळे शहर पोलिस दलाची बदनामी झाली. अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नये, यासाठी पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी याबाबतचे गुरुवारी आदेश काढले. ससून हॉस्पिटल येथे आरोपीकरीता नेमण्यात येणारे गार्ड हे विभागीय सहायक पोलीस आयुक्त व संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे रोज दिवसा चेक करतील. त्याचप्रमाणे रात्रगस्तीस असणारे सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त व विभागीय रात्रगस्त व पोलिस स्टेशन रात्रगस्त अधिकारी हे रात्री नियमितपणे या गार्डची तपासणी करतील. त्या ठिकाणी पाहणी करुन काही आक्षेपार्ह नाही याबाबत खात्री करतील. गार्ड सर्तक असल्याबाबत खात्री करुन त्याबाबत स्टेशन डायरी व भेट रजिस्टारमध्ये नोंद घेतील. व त्याबाबत तात्काळ नियंत्रण कक्षाला वायरलेसमार्फत कळवतील. नियंत्रण कक्ष अधिकारी ही माहिती वरिष्ठांना सादर करतील.
तसेच परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त व पोलिस उपायुक्त गुन्हे हे आठवड्यातून एक वेळा अचानक भेट देतील तसेच अपर पोलिस आयुक्त, गुन्हे हे १५ दिवसातून एकदा ससून हॉस्पिटलला अचानक भेट देऊन पाहणी करुन आवश्यक ती कार्यवाही करतील, असे आदेशात म्हटले आहे.