पुणे : गेल्या पाच वर्षांमध्ये पाच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या परिसरात दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. गुन्हेगाराची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
तौफिक रियाज भोलावाले (वय २४, कसबा पेठ) असे कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने साथीदारांसह विश्रामबाग, समर्थ, फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार, सत्तूर यांसारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने दुखापत करणे, साधी दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
फरासखाना पोलिसांकडून प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करून पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली. आतापर्यंत अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेच्या ८० कारवाया करण्यात आल्या आहेत.