‘पुलं’च्या घरी नस्ती उठाठेव करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:38 AM2018-06-26T04:38:55+5:302018-06-26T04:38:59+5:30
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु़ ल़ देशपांडे यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या व पुस्तकांची उचकपाचक करणाऱ्या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे़
पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु़ ल़ देशपांडे यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या व पुस्तकांची उचकपाचक करणाऱ्या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे़
जितसिंग राजपालसिंग टाक (२४, हडपसर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेमुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांच्या घरी झालेल्या चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे़ पोलिसांनी सांगितले, जितसिंग हा निगडी येथे एका ठिकाणी क्रिकेट खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाला मिळाली. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
जितसिंगने भांडारकर रोडवर घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. भांडारकर रोडवरील ‘मालती माधव’ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरात १८ डिसेंबर २०१७ रोजी हा प्रकार घडला होता़ बंद असलेली पु़ ल़ देशपांडे यांची दोन्ही घरे फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता, पण त्यांच्या घरात केवळ पुस्तके व अन्य साहित्य असल्याने त्यांनी संपूर्ण घरात उचकपाचक केली, परंतु त्यांना मौल्यवान असे काहीही मिळाले नाही. त्यांनी हे साहित्य अस्ताव्यस्त करून टाकून दिले व तेथून निघून गेले होते़
पु़ ल़ देशपांडे यांचे नातेवाईक दिनेश ठाकूर यांनी अमेरिकेतून आल्यावर याविषयी फिर्याद दिली होती़ पु. ल. देशपांडे यांच्या घरात चोरीचा हा दुसºयांदा हा प्रयत्न झाला होता़
जितसिंग हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने तीन साथीदार स्वप्नील ऊर्फ चोर दाद्या रणदिवे, गणेश राठोड (दोघे रा़ बिरासदारनगर, हडपसर) आणि करणसिंग रजपूतसिंग दुधानी (२१, रा़ रामटेकडी) यांच्या मदतीने घरफोड्या केल्या. स्वप्नील याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत.