मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
By admin | Published: May 12, 2016 01:37 AM2016-05-12T01:37:32+5:302016-05-12T01:37:32+5:30
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागेचा प्रश्न अनुत्तरीतच... मेट्रो केंद्रात रखडली.. विकास आराखड्यावर राज्य शासनाकडून केवळ बैठकाच सुरू..
पुणे : कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागेचा प्रश्न अनुत्तरीतच... मेट्रो केंद्रात रखडली.. विकास आराखड्यावर राज्य शासनाकडून केवळ बैठकाच सुरू...बीडीपी आरक्षणाबाबतही निर्णय नाही..रिंग रोडचा प्रश्न ‘जैसे थे’ पीएमपी एफएसआय, यांसह पुणे शहराचे अनेक प्रश्न राज्य शासनाच्या दरबारी प्रलंबित आहेत. यावर मुख्यमंत्री शुक्रवारी काय निर्णय घेतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
शहराच्या राज्य शासनाकडे प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या १३ मे रोजी सर्वपक्षीय खासदार, आमदार, महापालिकेतील पदाधिकारी व पक्षनेत्यांची बैठक घेणार आहेत. शासनदरबारी विविध कारणांनी रखडलेल्या या प्रश्नांवर या बैठकीत मार्ग निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उरुळी देवाची व फुरसुंगी येथे कचरा टाकण्यासाठी आखून दिलेली डेडलाइन उलटून गेली, तरी तिथे कचरा टाकला जात आहे. महापालिकेला कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध न झाल्याने शहराच्या कचऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.
पिंपरी सांडस येथील वनविभागाची जागा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेला मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. हा विषय बैठकीत मांडला जाणार आहे.
पुण्यानंतर नागपूर मेट्रोला मंजुरी मिळून त्याचे कामही मार्गी लागले; मात्र पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव अद्याप केंद्र शासनाच्या दरबारी रखडलेला आहे. शासनाकडे मुद्रांकावरील एलबीटीचा अधिभार यासह इतर निधी थकीत आहे, त्याचे गाऱ्हाणे मांडले जाणार आहे. त्याचबरोबर नदीसंवर्धन, एचएसएमटीआर आदी प्रश्न बैठकीत मांडले जाणार आहेत. (प्रतिनिधी)