महसूल विभागाने केलेल्या वाळू ट्रकच्या पंचनाम्याचा बांधकाम विभागाकडून पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 05:11 PM2020-07-29T17:11:30+5:302020-07-29T17:14:45+5:30
चुकीचा पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
कोरेगाव भीमा : शिक्रापुर (ता.शिरुर) येथे पकडलेल्या वाळुच्या डंपरच्या पंचनाम्यात तफावत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिध्द होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत केलेल्या फेर पंचनाम्यात डंपरमध्ये ८.२० ब्रास वाळु असल्याचे उघडकीस आल्याने आजपर्यंत महसुल विभागाने पकडलेल्या वाळुच्या पंचनाम्यात मोठा घोटाळा असल्याचा सबळ पुरावा तयार झाला आहे. या प्रकरणी चुकीचा पंचनामा करणाऱ्या महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.
शिक्रापुर येथे पकडलेल्या टाटा भारत बेंझ हायवा ( एमएच-१४. एच जी ७२९१) यात सहा ब्रासपेक्षा जास्त वाळु असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र,शिक्रापूरचे तलाठी अविनाश जाधव यांनी या गाडीत अंदाजे अडीच ब्रास वाळू असल्याबाबत पंचनामा केला. या पंचानाम्याबाबत शंका उपस्थित झाल्यानंतर ‘लोकमत’ मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस.डी. मुरकुटे, मंडलाधिकारी राजेंद्र आळणे व कामगार तलाठी अविनाश जाधव यांनी फेर पंचनामा करत डंपरमध्ये ८.३७ ब्रास वाळु असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले. त्यामुळे चुकीचा पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.
शिरुर तालुक्यात वाळु माफियांना महसुल व पोलीस यंत्रणा अभय देण्याचे मोठे कार्य करत असल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांकडून अद्याप गुन्हा का नाही दाखल ?
शिक्रापुर पोलीस ठाण्यातील डंपरमध्ये वाळुच्यावरती डस्टचा थर राजरोसपणे देवून पोलिसांची व महसुल विभागाची शुध्द फसवणुक होऊनही शिक्रापुर पोलिसांनी अद्याप गुन्हा का दाखल केला नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.
यापुढे पंचनामे कोण करणार
शिक्रापुर येथे सापडलेल्या डंपरचा चुकीचा पंचनामा करुन वाळु माफीयांना एकप्रकारे सहकार्यच महसुल विभाग करत असल्याचा पर्दाफाश झाला आहे. यापुढे पंचनामे कोण करणार याबाबत संभ्रम आहे.