पुण्यात रिक्षाचालकांचे ‘सूर्योदय ते सूर्यास्त’ जगार उपोषण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 08:51 AM2020-12-15T08:51:07+5:302020-12-15T08:51:07+5:30
Pune News : रिक्षाचालकांना विविध प्रकारे सहाय्य मिळावे, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिक्षा पंचायतीच्या प्रतिनिधींनी आज सकाळपासून पुण्यातील विधान भवनाबाहेर (कॉन्सिल हॉल) येथे उपोषण सुरु केले आहे.
पुणे : कोरोना व टाळेबंदीने हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे़ त्यामुळे रिक्षाचालकांना विविध प्रकारे सहाय्य मिळावे, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिक्षा पंचायतीच्या प्रतिनिधींनी आज सकाळपासून पुण्यातील विधान भवनाबाहेर (कॉन्सिल हॉल) येथे उपोषण सुरु केले आहे.
रिक्षाचालकांचे हे उपोषण सूर्यास्तापर्यंत चालणार आहे. रिक्षा पंचायतीच्या प्रतिनिधींनी सकाळपासून उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात रिक्षा चालकांचे विभागनिहाय प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून रिक्षा चालकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसून विभागीय आयुक्तांनी यात लक्ष घालावे अशी मागणी त्यांच्याकडे यावेळी करण्यात येईल.
याबाबत रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी सांगितले की, कोरोना व टाळेबंदीमुळे रिक्षाचालक उद्धवस्त झाला आहे. रिक्षाचालकांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने केली. परंतु, केवळ आश्वासनावर बोळवण करण्यात आली. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे जागर उपोषण सुरु करण्यात आले आहे.