पुणे : महापालिका निवडणुकीसाठी चारही पक्षांनी स्वबळाचे नारे दिले आहेत. आघाडी आणि युतीसाठी बोलणी चालू असली तरी सर्व जागांवर लढण्याची तयारी सुरू केली आहे. सर्वच्या सर्व १६२ जागांवर उमेदवार निश्चिती करण्यात इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे भाजपला अडचणी येत आहेत. अनेक जागांवर एकमत झालेले नाही. ज्या नावांवर एकमत होत नव्हते, ती नावे बाजूला ठेवून पुढील नावांवर चर्चा करण्यात आली. एकमत न झालेल्या जागांसाठी चर्चेची दुसरी फेरी घेण्यात येणार आहे. भाजपाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी पक्षाच्या कार्ड कमिटीच्या सदस्यांची बैठक मंगळवारी बाणेर येथील एका हॉटेलमध्ये झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, विजय काळे, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, सरचिटणीस उज्ज्वल केसकर, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पोटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.मात्र, प्रभागनिहाय भाजपाच्या उमेदवारांची नावे निश्चित करताना अनेक प्रभागांमधील नावांवर एकमत होण्यात अडचणी आल्या. भाजपात निर्माण झालेल्या गटबाजीचे दर्शन यानिमित्ताने दिसून येत होते. उमेदवाराच्या नावावर चर्चा सुरू असताना तो दुसरा गटाचा असल्यास त्याला लगेच विरोधी गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप घेतला जात होता. विरोध झाल्यामुळे ते नाव बाजूला ठेवले जायचे. एकमत होत नसलेल्या जागा बाजूला ठेवून पुढील नावांची निश्चिती करण्यात आली. शेवटपर्यंत कार्ड कमिटीच्या नावांवर एकमत न झाल्यास अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे.आठही आमदारांनी प्रभागांचा आढावा बैठकीत मांडला. त्यानुसार जागांची चाचपणी करण्यात आली. त्याआधारे शिवसेना, रिपाइं, रासप आदी पक्षांशी युतीबाबत बोलणी करण्यात येणार आहे, असे भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले.
स्वबळाचे नारे चारही पक्षांचे
By admin | Published: January 25, 2017 2:33 AM