'त्या' वेळी अयोध्येला गेल्याचा आनंद आणि अभिमान!पुण्यातील कारसेवकांनी जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 10:06 AM2020-08-05T10:06:56+5:302020-08-05T19:14:03+5:30

जय श्रीराम हो गया काम’ अशा घोषणा देत साखर वाटप  Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan

Ayodhya Ram Mandir bhumi pujan: Happiness and pride of going to Ayodhya! | 'त्या' वेळी अयोध्येला गेल्याचा आनंद आणि अभिमान!पुण्यातील कारसेवकांनी जागवल्या आठवणी

'त्या' वेळी अयोध्येला गेल्याचा आनंद आणि अभिमान!पुण्यातील कारसेवकांनी जागवल्या आठवणी

Next
ठळक मुद्देरामाला बंदीवानातून मुक्त केल्याची भावना

पुणे : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी राम मंदिराचे भूमीपूजन सोहळा होत आहे.त्यामुुुळे देशभरात उत्साहाचेे वातावरण आहे. पुण्यातील काही कारसेेवकांनी १९९२ सालच्या आठवणींना उजाळा दिला आहे.तसेच 'त्या' घटनेचा साक्षीदार असल्याचा आनंद आणि अभिमान आहे..अशा शब्दांत आपल्या भावना पण व्यक्त केल्या.

तो प्रसंग कायमचा ह्दयात कोरला गेलाय

शरयुच्या काठावरुन आठ दिवस आम्ही साध्वी ऋतुंबरा देवी आणि आचार्य धमेंद्र यांचे भाषण ऐकायला जात होतो. त्यातून जो जोश निर्माण केल्या जात होता, त्यामुळे सर्वच कारसेवक पेटून उठले होते. त्यातूनच बाबरीचे पतन झाले. तो सर्व प्रसंग कायमचा ह्दयात कोरला गेला असून आजही अगदी कालपरवा घडल्यासारखा हा इतिहास आठवतो, अशा शब्दांत कारसेवक जगन्नाथ कुलकर्णी यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. जगन्नाथ कुलकर्णी यांच्या वडील, दोन्ही भाऊ संघाचे स्वयंसेवक त्यामुळे लहानपणापासून ते संघ शाखेत जात. त्यातूनच त्यांच्यावर कोथरुड (संभाजीनगर) ची जबाबदारी देण्यात आली होती.

कुलकर्णी यांनी सांगितले की, पहिल्या शिलान्यास कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो, परंतु, त्यावेळी झाशीमध्येच आम्ही अडकून पडलो होतो.मात्र, दुसऱ्या वेळी कोथरुड भागातून आम्ही ९० जण दहा दिवस अगोदरच अयोध्येला गेलो.शिवाजीराव आढाव, दीपक सुर्वे, विनोद खत्री, अनिरुद्ध पळशीकर, बाळासाहेब हगवणे, अनंता सुतार, राम कडू असे अनेक संघस्वयंसेवक त्यावेळी आमच्या सोबत होते. शरयुच्या काठी तंबूत आमची रहायची व्यवस्था करण्यात आली होती. तंबूतच काहीतरी शिजवून आम्ही सकाळी ९ वाजता भाषण ऐकायचा जात होतो. त्या १० दिवसात आम्ही पुण्यातून पाठविलेल्या शिला शोधून काढल्या होत्या.रामलल्लाचे दर्शन एकदा घेतले. प्रत्येकाने मुठभर माती घेऊन जायचे ठरले होते.त्याप्रमाणे आम्ही सकाळीच सभास्थानी पोहचलो होतो.त्या दिवशी साध्वी ऋतुंबरा देवी, आचार्य धमेंद्र यांच्या भाषणांनी कारसेवक पेटून उठले आणि एक एक जथा चबुतऱ्यावर चढू लागला. त्याबरोबर सर्वांना स्फुरण चढले. जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दणाणून जात होता. सलग ७ ते ८ तासाच्या प्रयत्नानंतर तीनही चतुबरे पडल्यावर तेथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनी एकच जयघोष केला. त्या आनंदात कोणीही जेवले नव्हते. येताना आम्ही तेथील मातीबरोबर घेतली. मात्र, बाबरी पडल्यानंतर खूप भीती वाटू लागली होती. पण सुखरुप घरी परतो. रामाला बंदिवानातून मोकळा केल्याचे समाधान झाले होते. तो प्रसंग आजही ह्दयात कोरल्यासारखा ताजा आहे. .

.....आणि पोह्यांचा झाला भात

शरयुच्या काठी तंबूत आम्हाला जेवण बनविण्यासाठी काही साहित्य दिले होते. त्यात घटनेच्या दिवशी आम्ही सकाळीच पोहे बनविण्याचा बेत केला होता. पण, पोहे भिजविल्यानंतर ते निथळायचे असतात, याची आम्हाला कल्पनाच नव्हती. त्यामुळे पोहे बनविताना त्याचा भात झाला. तोच खाऊन आम्ही सभास्थानी गेलो आणि त्यानंतर कारसेवकांनी बाबरीचे पतन घडवून आणले, भाजपचे तत्कालीन नगरसेवक शाम सातपुते यांनी त्यावळचा हा अनुभव अजूनही आठवला की हसायला येत, असल्याचे सांगितले.

शाम सातपुते यांनी सांगितले की, ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील दिवसाच्या दिनाला उपस्थित असल्याचा अभिमान वाटतो. माझ्याबरोबर शरद गंजीवाले, धनंजय काळे, कुमार कुसाळकर, गणेश सावंत, संजय चोरगे, महादेव उदामले, अजय चौधरी, बाळु आमकर, पवन मुळे, राजाभाऊ कदम, कै. राम कंधारे, कै.संजय तागुंदे असे गोखलेनगर, वडारवाडी भागातील ४० जण आदल्या दिवशी अयोध्येला पोहचलो होतो. पोहे करताना झालेला भात खाऊन घाईघाईतच आम्ही सभास्थानी जाऊ लागलो.

‘जय श्रीराम हो गया काम’ अशा घोषणा देत साखर वाटप अचानक कारसेवकांचा एक जथा चतुबऱ्याच्या दिशेने गेला. त्यावेळी आमच्यातील काही जण तिकडे गेले. त्यांना पाहण्यासाठी आणखी काही जण गेले. त्यांना शोधण्यासाठी आम्ही सर्वच चबुतऱ्याच्या दिशेने गेलो तर सर्व जण बाबरी पाडत होते. आम्हीही त्यांच्यात सहभागी झालो. बाबरी पडल्यानंतर एकच जल्लोष केला गेला. त्या भागात अजूनही महिला परपुरुषाच्यासमोर येत नसत. पण, बाबरी पडल्याच्या आनंदात तेथील घरांमधील महिला आमच्याबरोबर नाचल्या होत्या. ‘जय श्रीराम हो गया काम’ अशा घोषणा येत साखर वाटली जात होती. सर्वत्र जल्लोष सुरु झाला होता. आम्ही त्या जागेचे दर्शन घेऊन मग परत रेल्वेने पुण्याला परतलो. आज रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात सहभागी असल्याचा अभिमान वाटतो.

Web Title: Ayodhya Ram Mandir bhumi pujan: Happiness and pride of going to Ayodhya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.