इंदापूरातील बाबीरगडावर शुकशुकाट; लाखोंच्या संख्येत होणारा यात्रा उत्सव यंदाही रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 04:27 PM2021-11-07T16:27:25+5:302021-11-07T16:27:37+5:30
सलग दुसर्या वर्षी यात्रा बंद असल्याने भाविकांनी निराशा व्यक्त केली
कळस : पुणे जिल्ह्यातील, इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीरगडावरील बाबिर देवाचा यात्रा उत्सव यंदाही कोरोना पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आला आहे. यात्रा कालावधीत मंदीर पुर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी देवाचे घट उठवून पालखी सोहळा झाला. शनिवार व रविवारी उपस्थित काही भाविकांनी बाहेरुनच दर्शन घेतले लाखोंची उपस्थिती असलेल्या यात्रेला यावर्षीही शुकशुकाट होता. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारी यात्रा सुनी सुनी होती. ग्रामपंचायत व प्रशासनाने ठराव करुन निर्बंध घातले होते.
अतिशय पुरातन अशा बाबीर मंदिराला ८०० वर्षांचा इतिहास आहे. उंच डोंगरावर बाबीरगडावर बाबिर देव आहे. येथे दगडी बांधकाम केलेले मंदिर आहे. या देवावर पशुपालक लोकांची फार श्रद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश मांडून लोक दर्शनासाठी येतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सलग दुसऱ्या वर्षी यात्रेवर बंदी आहे.
दिपावली पाडवा, माघ पौर्णिमा व गुढी पाडव्याला दरवर्षी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. यात्रेमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. घोंगडी बाजारपेठ, लाकडी खेळणी, यामध्ये दिवाळी पाडव्याला मोठी उलाढाल होते. व पारंपरिक गजेंढोल स्पर्धा गेली ३० वर्षे भरवली जात आहे. तसेच माघी यात्रेला जंगी कुस्ती आखाडा भरतो. मात्र सलग दुसर्या वर्षी यात्रा बंद असल्याने भाविकांनी निराशा व्यक्त केली. देवस्थानचे अध्यक्ष अजितसिंह पाटील, माजी सरपंच यशवंत कचरे उपस्थित होते. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.