दौंड : येथील नगरपरिषदेतील नागरिक हित संरक्षण मंडळाचे विश्वासू नगरसेवक बबलू कांबळे यांची गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली एक मताने निवड करण्यात आली. नगरसेवक प्रमोद देशमुख (उप-गटनेता), पूजा गायकवाड (पक्ष प्रतोद) यांनाही नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे. नागरिक हित संरक्षण मंडळाचे गटनेते राजेश गायकवाड यांनी राष्ट्रवादी शिवसेना युतीबरोबर सलगी वाढवल्यामुळे त्यांना गटनेते पदापासून दूर केले आहे. परिणामी त्यांच्या जागेवर बबलू कांबळे यांची वर्णी लागली आहे.
दरम्यान, रविवारी सायंकाळी नागरिक हित संरक्षण मंडळ आणि मित्रपक्षांची बैठक झाली. या बैठकीत नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात हालचाली झाल्याचे समजते. डिसेंबर महिन्यात दौंड नगरपरिषदेची निवडणूक लागण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. नगरपरिषदेत पालिकेत नगराध्यक्षांसह ११ नगरसेवक असे नागरिक हित संरक्षण मंडळाचे संख्याबळ आहे.
रविवारी झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, नगराध्यक्षा शितल कटारिया, नागरिक हित संरक्षण मंडळाचे अध्यक्ष गोविंद अग्रवाल, आरपीआयचे भारत सरोदे, रासपाचे नागेश बेलूरकर, फिरोज खान उपस्थित होते.
नगरपालिकेच्या सभागृहातील तत्कालीन गटनेते राजेश गायकवाड यांची विधाने पक्ष हितास बाधा आणणारी व सदस्यांच्या विरुद्ध वर्तन असणारी होती. त्यांची ही कृती महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अधिनियम १९८७ चे उल्लंघन करणारी असल्याने गायकवाड यांना गटनेते पदावरून पायउतार करण्यात आले असल्याचे नवनिर्वाचित गटनेते बबलू कांबळे यांनी सांगितले.
नागरिक हित संरक्षण मंडळाच्या विरोधात गेल्या वर्षीपासून गटनेते राजेश गायकवाड कामकाज करीत होते. मात्र, काही काम असल की आमच्याबरोबर गोड बोलायचे काम झाले की परत विरोधी वागायचे तेव्हा आम्ही ठरवलं की गायकवाड यांचे वागणे अहिताचे आहे. परिणामी त्यांना गटनेते पदावरून काढायचा निर्णय घेतला आणि निष्ठावंत नगरसेवक बबलू कांबळे यांना गटनेते पदांची संधी दिली.
शीतल कटारिया नगराध्यक्षा
०६ दौंड
बबलू कांबळे यांचा सत्कार करताना ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया व मान्यवर.