२५ कोटींचा गैरव्यवहार जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:10 AM2020-11-28T04:10:36+5:302020-11-28T04:10:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: वेगवेगळ्या चार कंपन्या स्थापन करुन सुमारे साडे पंचवीस कोटी रुपयांचा जीएसटी चुकविल्याप्रकरणी अटक करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: वेगवेगळ्या चार कंपन्या स्थापन करुन सुमारे साडे पंचवीस कोटी रुपयांचा जीएसटी चुकविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा व्यावसायिकांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. घोरपडे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.
चिराग बन्सल, कुणाल मोहन दास, अनिल यादव या तिघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. जीएसटी खात्यातील दक्षता विभागाच्या अधिकार्यांनी याप्रकरणी कारवाई केली.
या तिघा आरोपींनी वेगवेगळ्या चार कंपन्या स्थापन करुन २५ कोटी, ५६ लाख, ३०,५५४ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून या तिघांनीही अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यांच्य जामीन अर्जाला विशेष सरकारी वकील संदीप घाटे यांनी विरोध केला.
आरोपींना जामीन मिळाल्यास ते पुरावा नष्ट करण्याची शक्यता आहे. आरोपींनी फक्त कागदोपत्री व्यवहार दाखवून इनपुट टॅक्स क्रेडीटमध्ये हा सुमारे साडे पंचवीसकोटी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये आढळले आहे. त्यामुळे कलम १३२ नुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.