Pune Crime: चौकशी केल्याचा रागातून बांबूने मारले, ३ वर्ष कारावासाची शिक्षा
By नम्रता फडणीस | Published: November 27, 2023 04:30 PM2023-11-27T16:30:11+5:302023-11-27T16:30:58+5:30
लाकडी बांबुने डोक्यावर आणि खांद्यावर मारून गंभीर जखमी करणाऱ्याला तीन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा...
पुणे : किरकोळ कारणावरून लाकडी बांबुने डोक्यावर आणि खांद्यावर मारून गंभीर जखमी करणाऱ्याला तीन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांनी सुनावली. ओमप्रकाश राजेंद्र यादव (वय 23 रा. बिबवेवाडी, मूळ. बिहार) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत विजय योगीराज जगताप (वय 46, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विश्वास सातपुते यांनी काम पाहिले. ही घटना 23 ऑक्टोबर 2015 रोजी बिबवेवाडी येथील पापळ वस्ती येथे घडली. यादव हा बिहारी आहे. तो कामाच्या शोधात पुण्यात आला होता. तो भाड्याने राहत होता. फिर्यादी मॉर्निंग वॉक करून परत जात होते. त्यावेळी त्यांना यादव हा अनोळखी दिसला. त्यांनी तो जेथे भाड्याने राहतो. त्या मालकाला त्याच्याविषयी विचारले. याचा राग मनात धरून त्याने लाकडी बांबुने मारहाण करून फिर्यादींना गंभीर जखमी केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न (भा.द.वि कलम 307) नुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने मारहाण (भा.द.वि कलम 324) नुसार शिक्षा सुनावली.