शनिवारवाड्यावर सर्व खासगी कार्यक्रमांना बंदी, कोरेगाव भीमाची पार्श्वभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 06:50 AM2018-01-15T06:50:35+5:302018-01-15T06:51:00+5:30
शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेतील वादग्रस्त व भडकावू भाषणानंतर कोरेगाव भीमाची दंगल भडकली व त्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले.
पुणे : शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेतील वादग्रस्त व भडकावू भाषणानंतर कोरेगाव भीमाची दंगल भडकली व त्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर यापुढे शनिवारवाड्यावर सर्व प्रकारच्या खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्यात येणार आहे. यासाठी पोलीस व वाहतूक शाखेच्या वतीने पोलिसांना सूनचा देण्यात आल्या असून, भविष्यात अशा वादग्रस्त कार्यक्रमांमुळे उद्भवणारे वाद टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अधिकृत अध्यादेश लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले.
पुणे शहराचे वैभव व ऐतिहासिक वारसा म्हणून शनिवारवाड्याकडे पाहिले जाते. पुण्यात पर्यटनासाठी येणारे देश-विदेशातील नागरिक आवर्जून शनिवारवाड्याला भेट देतात. शनिवारवाड्यामुळे पुण्याच्या पर्यटनालादेखील वेगळी ओळख मिळाली आहे. याच शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दीनिमित्त एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनजू छात्र संघटनेचा उमर खलिद यांच्या वादग्रस्त व भडकावू भाषणांमुळेच कोरेगाव भीमाची दंगल उसळल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे शनिवारवाड्यावर सर्व खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
कार्यक्रमांमुळे वाहतूककोंडी : शनिवारवाड्यालगतच संवेदनशील परिसर असून, शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या भागात एखाद्या कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच कार्यक्रमामुळे येथे मोठी वाहतूककोंडीदेखील होत असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने महापालिकेला कळविण्यात आले आहे. तसेच राज्याच्या विविध भागांतून शनिवारवाडा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहली देखील येतात. कार्यक्रमांमुळे बाहेरून येणाºया पर्यटकांना त्याचा आनंद घेता येत नाही. यामुळेच महापालिकेच्या वतीने यापुढे शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.