जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर शनिवार- रविवारी बंदी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:50+5:302021-06-26T04:08:50+5:30
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाला, पण जिल्ह्यातील अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ...
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाला, पण जिल्ह्यातील अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे शनिवार-रविवारी बंदच असणार आहेत. त्यावरील बंदी कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत शहर आणि ग्रामीण भागात सध्या लागू असलेले निर्बंध आणखी एक आठवडा कायम ठेवण्यात येत आहेत. दरम्यान, तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे केले.
विधान भवन येथे दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. बैठकीसाठी खासदार गिरीष बापट, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, ॲड. वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार ॲड. अशोक पवार, चेतन तुपे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंके आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. तसेच नियोजन करुन पेसा भागातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. सुपर स्प्रेडर, दुकानदार, मार्केटमधील व्यवसायिक यांची कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे. तसेच दर पंधरा दिवसांनी रॅपिड ॲन्टीजन टेस्ट बंधनकारक आहे. दिव्यांग नागरिकांचे लसीकरण सुरु आहे.
प्रशासनाने म्युकरमायकोसिस रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता प्रशासनाने व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. पर्यटनाला व सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे. विवाह समारंभात नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, हॉटेल व्यवस्थापन व मंगल कार्यालयांनी प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी. जे नियमांची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये पंधरा जुलैपर्यंत बंदच ठेवण्यात येतील. सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचे बिल व औषधांचे बिल याविषयी तक्रारी येतात. त्यामुळे प्रशासनाने काटेकोरपणे लेखापरीक्षण करण्याच्या सूचनाही वळसे पाटील यांनी दिल्या.
डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे, जबाबदारीने वागणे यामुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येईल.
विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोरोना रुग्णस्थिती व लसीकरणाबाबत माहिती दिली.